इंग्लंडविरुद्धची दुसरी अ‍ॅशेस कसोटी ऑस्ट्रेलियाने वाचवली. स्टीव्ह स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्नस लाबुशेनने केलेल्या झुंजार अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. या मालिकेतील २ सामन्यांनंतर ICC ने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने दुसरे स्थान परत मिळवले आहे. मात्र टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अव्वलस्थानी कायम आहे.

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथने दोनही डावात शतके ठोकली होती. तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने ९२ धावांची खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीच्या बळावर स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. चेंडू कुरतडण्याप्रकरणी स्मिथला निलंबित करण्यात आले होते. ही शिक्षा संपल्यानंतर त्याने ‘अ‍ॅशेस’मधून पुनरागमन केले आणि आपले दुसरे स्थान परत मिळवले. याशिवाय श्रीलंकेचा दिमुथ करूणरत्ने याच्या विजयी खेळीमुळे त्याने ४ स्थानांची उडी घेत ८ वे स्थान पटकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

गोलंदाजांनध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या जोफ्रा आर्चरने ५ बळी टिपण्याची किमया करून पदार्पणातच ८३ व्या स्थानी झेप घेतली. अकिला धनंजय याने सामन्यात ६ गडी बाद करत ९ स्थानांची झेप घेत ३६ वा क्रमांक पटकावला. न्यूझीलंडकडून सहावी कसोटी खेळणाऱ्या फिरकीपटू जॅक लीचने ४० व्या स्थानी झेप घेतली.

दरम्यान, दुसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा तो जिद्दीने मैदानात उतरला खरा.. पण तो लगेचच बाद झाला. त्याने ९२ धावांची खेळी केली. त्याला उर्वरित सामन्यातून माघार घ्यावी लागली. तिसऱ्या कसोटीत तो खेळू शकेल की नाही याबाबतही साशंकता आहे.