वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. अष्टपैलूंच्या यादीत त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वलस्थान पटकावले. तसेच अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलूंच्या यादीत अव्वल ठरणारा स्टोक्स पहिलाच इंग्लिश खेळाडू आहे. ही स्टोक्सची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. टॉप ५ अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

वेस्ट इंडिजला पराभूत करताना स्टोक्सने दमदार कामगिरी केली. पहिल्या डावात त्याने दीडशतक (१७६) तर दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक (७८) ठोकले. दोन्ही डाव मिळून त्याने ३ बळी घेतले. या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तसेच कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतदेखील त्याने मार्नस लाबूशेनला खाली ढकलत तिसरे स्थान पटकावले. आता त्याच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा विराट कोहली दोन फलंदाज आहेत. ३ सामन्यांच्या मालिकेतील २ सामन्यांनंतर मालिकेत ३४३ धावांसह स्टोक्स सर्वाधिक धावांचा मानकरी आहे. त्याने पहिल्या कसोटीतदेखील ४३ आणि ४६ धावा केल्या होत्या. ५८९ चेंडूचा सामना करत स्टोक्स आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक चेंडूचा सामना करणारा फलंदाज ठरलाय. ५ षटकार लगावत सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज हा मानही स्टोक्सच्या नावावर आहे.

मँचेस्टर कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर ११३ धावांनी मात करत यजमान इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सलामीच्या सामन्यात झालेला पराभव, दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाणं यामुळे इंग्लंडला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे दिसत होतं. पण अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत वेस्ट इंडिजचा डाव झटपट गुंडाळला.