ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. न्यूझीलंड विरुद्द वेस्ट इंडिज दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली. विल्यमसन दुसऱ्या कसोटी सामन्यात न खेळल्यामुळे विराट कोहलीला याचा फायदा झाला आहे. विल्यमसन दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरला असून विराटने ८८६ गुणांसह आपलं दुसरं स्थान पुन्हा मिळवलं आहे.

विराट कोहली व्यतिरीक्त भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेचंही Top 10 मध्ये पुनरागमन झालं आहे. ७२६ गुणांसह अजिंक्य सध्या दहाव्या स्थानावर आहे. याव्यतिरीक्त चेतेश्वर पुजाराने ७६६ गुणांसह सातवं स्थान कायम राखलं आहे. गोलंदाजांमध्ये भारतीय खेळाडूंची आश्वासक कामगिरी झाली असून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन आश्विन यांनी TOP 10 मध्ये आपलं स्थान मिळवलं आहे.

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अग्नीपरीक्षा सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. १७ डिसेंबरपासून अॅडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्याने कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

अवश्य वाचा – इशांत शर्माशिवाय भारतीय गोलंदाज २० बळी घेऊ शकतात – अजिंक्य रहाणे