ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला चांगलीच फलदायी ठरलेली आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं. यामुळे पंतचं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतलं स्थान सुधारलं असून तो आता 17 व्या स्थानावर पोहचला आहे. 1973 साली माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी कसोटी क्रमवारीत 17 वं स्थान पटकावलं होतं, त्यांच्या या कामगिरीशी ऋषभ पंतने बरोबरी केली आहे. याचसोबत पंतने 673 गुणांची कमाई करुन आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळवणारा भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीच्या नावावर 662 गुण जमा होते.

अवश्य वाचा – ऋषभ पंतचं भविष्य उज्वल – सौरव गांगुली

भारताच्या कसोटी मालिकेतील विजयात ऋषभ पंतने मोलाचा वाटा उचलला आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत 7 डावांमध्ये पंतने 350 धावा काढल्या आहेत. चेतेश्वर पुजारानंतर मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. याचसोबत यष्टींमागेही पंतने आपली कमाल दाखवली असून, त्याने 20 झेल घेत कसोटी मालिकेत यष्टींमागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे. कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारत आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – 2019 विश्वचषकसाठी ऋषभ पंतचा नक्की विचार होईल – एम. एस. के. प्रसाद