भ्रष्टाचारविरोधी पथकापुढे ब्रेंडन मॅक्क्युलम याने दिलेल्या साक्षीचा तपशील प्रसारमाध्यमांपर्यंत कसा पोहोचला याची चौकशी करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘समितीपुढे झालेल्या साक्षींची माहिती गोपनीय असूनही त्यातील काही भाग प्रसारमाध्यमापर्यंत कसा पोहोचला याचेच आश्चर्य वाटत आहे. अशी गोपनीय माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यास जबाबदार कोण आहे याची माहिती आम्ही घेणार असून दोषी व्यक्तींविरुद्ध कारवाईदेखील होऊ शकते. भ्रष्टाचारविरोधी समितीवरील विश्वासार्हता टिकून राहणे महत्त्वाचे आहे.’’
रिचर्डसन पुढे म्हणाले, ‘‘खेळातील भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा कायम असून मॅक्क्युलम याची याबाबत कोणतीही चौकशी होणार नाही. मॅक्क्युलमने भ्रष्टाचारविरोधी समितीला अतिशय चांगले सहकार्य केले आहे. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याने त्याच्यावर असलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली आहे. त्याने दिलेली माहिती गोपनीय होती मात्र काही अक्षम्य चुकांमुळे ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’’
बांगलादेशात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळी आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या एका सदस्याने भारतीय सट्टेबाजाशी संपर्क साधला असल्याचे वृत्त ढाका येथील एक वाहिनीने दिले होते. तसेच या वाहिनीने संबंधित अधिकारी व सट्टेबाज यांच्यातील संभाषणाची कॅसेटही दाखविली होती. या प्रकाराबद्दल आयसीसीने खेद व्यक्त केला असून समितीच्या संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाईल, असे रिचर्डसन यांनी सांगितले.
न्यूझीलंडचा लोऊ व्हिन्सेंट याची चौकशी केली जाणार काय असे विचारले असता रिचर्डसन म्हणाले, ‘‘चौकशी समितीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्याने सविस्तर उत्तरे दिली आहेत. त्याने आजपर्यंत वेळोवेळी आम्हास सहकार्य केले आहे.’’