जो थांबला, तो संपला.. हा सुविचार सर्वश्रुतच आहे. परंतु क्रिकेटमध्ये आता गोलंदाजांवर तरी न थांबण्याचे दडपण असणार आहे. आर. अश्विन, मोहम्मद हफीझ किंवा सुरेश रैना यापुढे गोलंदाजी करताना थांबले, तर त्यांच्यावर पंचांचे बारकाईने लक्ष असेल. गोलंदाजी करताना गोलंदाज अनुचित पद्धतीने थांबल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कलम क्रमांक ४२.२चा भंग होईल. त्यामुळे पंचांनी योग्य निरीक्षण करून आपले निर्णय घ्यावे, असा इशारा आयसीसीकडून देण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धातील एका एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलमचा झेल स्टीव्ह स्मिथने अयोग्य पद्धतीने झेलल्याचे प्रकरण चांगलेच तापले होते. फलंदाज आलमकडे चेंडू पोहोचण्याआधीच स्मिथ स्लिपवरून लेग स्लिपपर्यंत पोहोचला होता.
‘‘गोलंदाज किती काळ थांबला, हे मोजण्यासाठी ‘स्टॉपवॉच’ वापरले जाणार नाही. परंतु पंचांनी गोलंदाजांचे निरीक्षण करावे. जर गोलंदाज जाणीवपूर्वक थांबत असेल तर तो चेंडू ‘डेड बॉल’ ठरवण्यात यावा,’’ असे आयसीसीकडून नमूद करण्यात आले आहे.