दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. रविवारी हा महामुकाबला रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान अशा तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांना हरवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध खेळण्याआधी, सर्व खेळाडू ताजेतवाने रहावेत यासाठी संघ व्यवस्थापनाने एक युक्ती केली. दोन दिवस सरावातून सुट्टी घेऊन सर्व खेळाडूंनी जोहान्सबर्ग येखील नेल्सन मंडेला यांच्या पुतळ्याला भेट दिली. “संघातले बहुतांश खेळाडू पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत आलेले आहेत, त्यामुळे अंतिम सामन्याआधी स्वतःला दडपणापासून दूर ठेवायला आम्ही छोटीशी सहल काढायचं ठरवलं, आणि मंडेला यांच्या पुतळ्याला भेट दिल्यानंतर सर्व खेळाडूंची उर्जा ही कमालीची पाहण्यासारखी होती.” संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा यांनी पीटीआसोबत बोलताना माहिती दिली.

यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, प्रियम गर्ग, रवी बिश्नोई, अथर्व अंकोलेकर यासारखे तरुण खेळाडू आतापर्यंतच्या सामन्यांच चमकले आहेत. मुंबईकर यशस्वी जैस्वालने उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेली खेळी ही उल्लेखनीय होती. अथर्व अंकोलेकरने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली अष्टपैलू कामगिरीही ही वाखणण्याजोगी होती. याव्यतिरीक्त कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई हे भारतीय गोलंदाज सध्या चांगलेच फॉर्मात आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.