संपूर्ण जग सध्या करोना विषाणूच्या विळख्यात आलेलं आहे. भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तानही याला अपवाद नाही. जगभरात या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. दरम्यानच्या काळात समाजातील काही व्यक्तींनी स्वतःहून पुढे येत गरजू लोकांसाठी जिवनावश्यक वस्तू मोफत देत आपलं कर्तव्य बजावलं आहे. आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये असलेले पाकिस्तानचे पंच अलिम दार यांनीही सध्याच्या खडतर काळात आपलं सामाजिक भान राखलं आहे.

पाकिस्तानमधील गरजू व्यक्तींसाठी अलिम दार यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. लाहोर शहरात अलिम दार यांचं Dar’s Delighto नावाचं हॉटेल आहे. सोशल मीडियावर दार यांनी ही घोषणा केली आहे.

सध्याचा काळ खडतर आहे. करोनाशी लढण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा मेहनत करत आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत ज्यांच्याकडे काही काम नाहीये, किंवा ज्यांना जेवणाची भ्रांत आहे अशा लोकांसाठी माझ्या हॉटेलमध्ये मोफत जेवण असेल असं दार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांना करोनाची लागण झालेली आहे. याआधी माजी पाक क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही आपल्या परिसरातील लोकांना मोफत अन्नधान्य देत आपलं सामाजिक जबाबरादी पूर्ण केली होती.