अंडर १९ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर मात करत सेमी फायनलमध्ये धडक दिली. सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगण्याची शक्यता असून भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यातील विजेता संघ सेमी फायनलमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळाल्यास भारत- पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी मैदानात पुन्हा एकदा आमने-सामने असतील.

अंडर- १९ वर्ल्डकपमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे आघाडीचे चार फलंदाज ४३ धावांवर माघारी परतले होते. मात्र, यानंतर वांडिले मॅकवेतू आणि जेसन निमंड यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मॅकवेतूने ६० धावांची खेळी करत एकतर्फी लढत दिली. जेसन निमंडने ३६ धावांची खेळी करत त्याला साथ दिली. उर्वरित खेळाडू फलंदाजीत सपशेल अपयशी ठरले आणि आफ्रिकेला ५० षटकात ९ विकेटच्या मोबदल्यात १८९ धावाच करता आल्या. पाकिस्तानतर्फे मोहम्मद मुसाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. २९ धावांच्या मोबदल्यात त्याने आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. तर शाहिन शाह आफ्रिदीने २ आणि अर्शद इक्बाल, हसन खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आफ्रिकेचे १९० धावांचे लक्ष्य पाकिस्तानने सात विकेटच्या मोबदल्यात गाठले. अली झरयब आसिफने नाबाद ७४ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. साद खानने २६ धावा आणि रोहैल नाझिरने २३ धावांची खेळी करत विजयात योगदान दिले. आफ्रिकेतर्फे निमंडने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. पाकने ३ विकेट आणि २ षटके राखून विजय मिळवला. अली झरयबला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आफ्रिकेवरील विजयासह पाकने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला असून सेमीफायनलमध्ये पाकसमोर भारताचे आव्हान असू शकते. शुक्रवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ सेमी फायनलमध्ये पाकशी भिडणार आहे. भारताने या सामन्यात विजय मिळाल्यास सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होऊ शकेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.