अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशवर मात करत सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. ३० जानेवारी रोजी ही लढत रंगणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशवर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी भारताचा सामना बांगलादेशशी होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर मनोज कालरा ९ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार पृथ्वी शॉने शुभम गिलच्या साथीने डाव पुढे नेला. पृथ्वी शॉ ४० धावांवर बाद झाला. तर शुभमने ८६ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. अभिषेक शर्मानेही अर्धशतक ठोकून संघाला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. भारताने ४९.२ षटकांत सर्व विकेट गमावून २६५ धावा केल्या. बांगलादेशतर्फे काझी ओनिकने ४८ धावांमध्ये भारताच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. तर नयीम हसन आणि सैफ हसन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

भारतीय गोलंदाजांनीही चोख भुमिका बजावत बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. सलामीवीर पिनाक घोषचा (४३ धावा) अपवाद वगळता अन्य बांगलादेशी कोणताही फलंदाज छाप पाडू शकला नाही. बांगलादेशचा डाव १३४ धावांमध्ये गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारतातर्फे कमलेश नागरकोटीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर अभिषेक शर्मा आणि शिवम मावी या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ३० जानेवारी रोजी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

सेमीफायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने आल्याने क्रीडाप्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. पाकिस्तानने आफ्रिकेचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक दिली होती.