युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या गतविजेत्या भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. या पराभवाने निराश झालेल्या भारताला पाचवे स्थान मिळवण्याची संधी होती. श्रीलंकेवर ७६ धावांनी मात करीत भारताने पाचवे स्थान मिळवले.
इंग्लंडच्या फलंदाजाला उद्देशून आक्षेपार्ह उद्गार काढल्यामुळे कर्णधार विजय झोलवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. विजयच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. भारताने प्रथम फलंदाजी करताना २९१ धावांची मजल मारली. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या दीपक हुडाने ७ चौकार आणि ४ षटकारांसह ७६ धावांची नाबाद खेळी केली. श्रेयस अय्यरने ७ चौकारांसह ५९ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे अनुक फर्नाडो, हशेन रामानायके आणि एके टायरुन यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेचा डाव २१५ धावांत आटोपला. सदिरा समराविक्रमाने सर्वाधिक ५८ धावा केल्या. दीपक हुडाने सर्वाधिक ३ बळी घेतले. अष्टपैलू कामगिरीसह भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या दीपक हुडालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.