आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बहुप्रतिक्षीत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०१८ ते २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीतला ‘फ्युचर टूर प्रोगाम’ आयसीसीने जाहीर केला असून यामध्ये कसोटी अजिंक्यपद व वन-डे लीग स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. जुलै २०१९ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर २०२० सालात भारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघांमधील सामन्यापासून वन-डे लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

१५ जुलै २०१९ ते ३० एप्रिल २०२१ असा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा कार्यकाळ राहणार आहे. या स्पर्धेत कसोटी क्रमवारीतले सर्वोत्तम ९ संघ सहभागी होणार आहेत. आयसीसीने आखलेल्या वेळापत्रकानूसार प्रत्येक संघ एक सामना आपल्या घरच्या मैदानावर तर एक सामना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम दोन संघ २०२१ साली अजिंक्यपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसोबत वन-डे लीग स्पर्धेत १३ संघ सहभागी होणार आहेत. कसोटी खेळणारे १२ संघ आणि नेदरलँड यांचा वन-डे लीग स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. १ मे २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान ही स्पर्धा रंगेल. भारतात २०२३ मध्ये होत असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी वनडे लीग महत्त्वाची ठरणार आहे. यजमान भारतासह क्रमवारीतील पहिले ७ संघ वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरतील तर तळाच्या ५ संघांना आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे.