24 November 2017

News Flash

महिला विश्वचषक स्पध्रेतील पाकिस्तानच्या सामन्यांचे ठिकाण आयसीसी ठरवणार : बीसीसीआय

मुंबईत होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानचा सहभाग असल्यामुळे शिवसेनेने दर्शविलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 16, 2013 5:12 AM

मुंबईत होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानचा सहभाग असल्यामुळे शिवसेनेने दर्शविलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सावध भूमिका घ्यावी लागली आहे. पाकिस्तानी संघासाठीचे सामने मुंबईतच घ्यावेत किंवा मुंबईबाहेर, याबाबतचा अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) घेईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
‘‘मुंबईतील परिस्थितीची आम्ही आयसीसीला जाणीव करून देऊ. ते पाकिस्तानच्या सामन्यांच्या ठिकाणाबाबतचा निर्णय घेतील,’’ असे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.
पाकिस्तानी सैन्याने सीमेवर दोन भारतीय जवानांना ठार केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने रविवारी मुंबई हॉकी असोसिएशन स्टेडियमवर निदर्शने केली. याचप्रमाणे हॉकी इंडिया लीगमधील पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागाला आपला विरोध दर्शविला. त्यामुळे मुंबई फं्रेचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना मायदेशात परत पाठविण्याचा निर्णय घेतला.
आठ संघांचा सहभाग असलेली महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ३१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या स्पध्रेत पाकिस्तानचाही सहभाग आहे. हे सामने वानखेडे स्टेडियम, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीएचे मैदान, एमआयजी आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने या स्पध्रेसंदर्भातील सुरक्षेबाबत बीसीसीआयला मंगळवारी कल्पना दिली. यानंतर बीसीसीआयने स्पष्ट केले की, सुरक्षेबाबतच्या सर्व गोष्टींची पडताळणी करून आयसीसी याबाबत निर्णय घेईल. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, पाकिस्तानचा संघ २६ जानेवारीला भारतात दाखल होणार आहे. ते एमसीएच्या वांद्रे-कुर्ला संकुलात आपले साखळी सामने खेळणार आहेत.
आयपीएलचा लिलाव चेन्नईत
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) खेळाडूंचा लिलाव ३ फेब्रुवारीला चेन्नईत होणार आहे, असा निर्णय बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीने घेतला आहे.

अझरबाबतचा निर्णय तूर्तास लांबणीवर
मोहम्मद अझरुद्दीनवर बीसीसीआयने घातलेली आजीवन बंदी उठविण्याचा निर्णय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने घेतला होता. या संदर्भात बीसीसीआयने उच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. मॅच-फिक्सिंगसंदर्भात अझरुद्दीनवर घातलेली बंदी ही ‘बेकायदेशीर’ असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. ‘‘या आदेशाचे स्पष्टीकरण देणारा खुलासा आम्ही आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाकडून मागवत आहोत. तो आल्यावरच आम्हाला अझरबाबत निर्णय घेता येईल,’’ असे बीसीसीआयकडून समजते.

बारिया आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पध्रेचे पुनरुज्जीवन
बीसीसीआयने रोहिंटन बारिया आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पध्रेचेही पुनरुज्जीवन करण्याचे निश्चित केले आहे. ‘‘महाविद्यालयीन स्तरावरील गुणवत्ता हेरून त्याची जोपासना करण्याच्या उद्देशाने आम्ही बारिया आंतर विद्यापीठ स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचे ठरविले आहे. विद्यापीठांची संघटना ही स्पर्धा आयोजित करील,’’ असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले.

राजस्थान रॉयल्ससंदर्भातील वाद शुक्ला सोडविणार
कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि शासकीय क्रीडा परिषद यांच्यातील वादाचीही चर्चा झाली. जयपूरमध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यांवर या वादाचे सावट होते. ‘‘आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला दोन्ही पक्षांशी चर्चा करून यावर तोडगा काढतील. या संदर्भात तोडगा न निघाल्यास अहमदाबाद किंवा अन्यत्र राजस्थान रॉयल्सचे सामने हलविण्यात येतील,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजते.

First Published on January 16, 2013 5:12 am

Web Title: icc will deside the place for women worldcup competition with pakistan bcci