भारताचा महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज ४८व्या वर्षात पदार्पण केले. २४ एप्रिल १९७३ला जन्मलेल्या सचिनने क्रिकेटच्या माध्यमातून स्वत: ला सिद्ध करत भारतासाठी अनेक विक्रम नोंदवले. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला आज जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही सचिनला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. आज सचिन खेळत असता तर, तो जोफ्रा आर्चर, पॅट कमिन्स आणि कगिसो रबाडा या आजच्या वेगवान गोलंदाजांना कसा सामोरा गेला असता, याचा एक व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा, पाकिस्तानचा हसन अली, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान या वेगवान गोलंदाजांना दाखवण्यात आले आहे. यात सचिन त्यांच्या गोलंदाजीवर कसे फटके खेळतो, हे दाखवण्यात आले आहे.

 

सचिनची कारकीर्द

१६ नोव्हेंबर २०१३ म्हणजे २४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर सचिनने क्रिकेटला अलविदा केले. सचिनने २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा आणि ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सचिनच्या खात्यात ३४,३५७ धावा जमा आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिनने २०१०मध्ये ग्वालियर येथील रुप सिंह स्टेडियममध्ये १४७ चेंडूत २०० धावांची खेळी केली होती. मुंबईत झालेल्या अखेरच्या सामन्यात सचिनने ११८ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या.