ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज उद्घाटनाची लढत

सिडनी : महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारपासून भारत आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीने सुरुवात होत आहे. विश्वचषक स्पर्धेत अडखळत कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने यंदा मात्र कामगिरीत सातत्य राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

कामगिरीत सातत्य नसणे, ही समस्या भारताला गेल्या अनेक महिन्यांपासून सतावत आहे. नुकत्याच झालेल्या तिरंगी स्पर्धेतही भारताला याचाच फटका बसला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारताला विजेतेपदावर नाव कोरता आले नाही. बाद फेरीत मजल मारल्यावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवायचे असल्यास भारताच्या मधल्या फळीला कामगिरी उंचवावी लागणार आहे. मधल्या फळीतील फलंदाजांची हाराकिरी यावर भारताला आता मेहनत घ्यावी लागणार आहे.

१६ वर्षीय युवा फलंदाज शफाली वर्मा हिने बऱ्याचदा भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे. मात्र सलामीवीर स्मृती मानधनाचे कामगिरीतील असातत्य भारताला भोवत आहे. जेमिमा रॉड्रिग्जने आतापर्यंत आपली छाप पाडली आहे. तिच्याकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार हरमनप्रीतकडून मोठय़ा आशा असताना तिच्या अपयशाचा भारताला फटका बसला आहे. त्यामुळे या सर्वावर भारताला लवकरात लवकरत तोडगा काढावा लागणार आहे.

तिरंगी स्पर्धेतील अंतिम सामन्यात १६ वर्षीय रिचा घोषने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आता तिच्याकडूनही भारताला भरपूर अपेक्षा आहेत. गोलंदाजीत भारताची मदार फिरकीपटूंवर असून शिखा पांडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे.

भारताचा सांघिक कामगिरी करण्यावर भर असेल. विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकायच्या असतील तर आम्हाला एकत्र येऊनच कामगिरी करावी लागणार आहे. त्यामुळे आम्हाला एका किंवा दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून चालणार नाही. जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, रिचा घोष यांसारख्या युवा खेळाडू संघात असल्यामुळे दडपण झुगारून लावण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्यांच्यावर आमच्यापेक्षा अधिक दबाव असेल.    

– हरमनप्रीत कौर, भारताची कर्णधार

संघ

भारत : तानिया भाटिया, हरलीन देवल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, हरमनप्रीत कौर (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, शफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव.

ऑस्ट्रेलिया : इरिन बर्न्‍स, निकोला कॅरे, अ‍ॅश्ले गार्डनर, रचेल हेन्स, अलिसा हिली, जेस जोनासेन, डेलिसा किम्मिन्स, मेग लॅनिंग (कर्णधार), सोफी मॉलिनेयूक्स, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगान शट, अ‍ॅनाबेल सदरलँड, तायला व्लाएमिंक, जॉर्जिया वेअरहॅम.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी