लॉर्डसच्या मैदानावर रंगतदार झालेल्या सामन्यात भारतीय संघाला ९ धावांनी पराभूत करुन इंग्लंडने महिला विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय संघाच्या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला असला तरी महिलांच्या इथंपर्यंतच्या प्रवासाचे नेटिझन्सनी कौतुक केलं आहे. ज्याप्रकारे भारतीय संघाच्या अंतिम फेरीतील प्रवेशानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला अगदी त्याचप्रमाणे क्रिकेट चाहते पराभवानंतरही महिलांच्या खेळाची स्तुती करत आहेत. तुम्ही जिंकला किंवा पराभूत झाला यापेक्षा लॉर्डसच्या मैदानात चांगला खेळ दाखवलात हे कोणीही विसरणार नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता इरफान खानने ही भारतीय महिला संघाच्या खेळाचे कौतुक केले. त्याने ट्विटवर लिहलंय की, खेळात पराभव आणि विजय होतच असतो. पण तुम्ही मैदानात जो खेळ दाखवला तो अविस्मरणीय असाच होता. एका नेटिझन्सने मिताली राजचा फोटो शेअर करुन तुम्ही विश्वचषक जिंकला नसला तरी क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली, असे ट्विट करत भारतीय संघाच्या खेळाला दाद दिली.अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात भारताला ९ धावांनी भारताला पराभव स्वीकारावा लागला. गौतम गंभीरने सामना पाहिल्याचे सांगत महिलांनी लक्षवेधी कामगिरी केल्याचे म्हटले आहे.

विजयाने हुलकावणी दिली असली तरी भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा तुम्ही बदलला आहात. तुमच्या स्पर्धेतील प्रवासाला सलाम, असे ट्विट वीरेंद्र सेहवागने केले आहे. क्रिकेटर्सच्या व्यतिरिक्त राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी देखील महिलांचे कौतुक केलंय. तुम्ही लक्षवेधी कामगिरी केली असून तुमच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशवासियांना तुमचा अभिमान आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाला खास शुभेच्छा ट्विट देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय महिलांच्या खेळीला दाद दिली. भारतीय संघ मैदानात पूर्ण ताकदीने खेळला. या दमदार खेळीने त्यांनी  छाप सोडली आहे, असे ट्विट मोदींनी केले आहे.