क्रिकेटच्या पंढरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्याप्रमाणे दमदार खेळी दाखवत भारतीय संघ या सामन्यात इतिहास रचणार का? याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे भारतीय संघात चमकत्कार करण्याची क्षमता असल्याची चर्चा इंग्लंडमध्ये रंगताना दिसते. भारतीय संघाने कांगारुंसाठी अवस्था करु नये, यासाठी इंग्लंड पुरुष संघाचा माजी कर्णधार याने इंग्लंडच्या महिला संघाला विजयासाठी एक मंत्र दिलाय. हरमनप्रीतला रोखायचे असेल तर तिच्यासमोर फिरकी गोलंदाजांचा वापर टाळावा, असा सल्ला त्याने दिलाय.

नासिर हुसेनने डेलीमेल या वृत्तपत्रात एक कॉलम लिहला आहे. यात त्याने भारतीय संघात चमत्कार करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ११५ चेंडूत १७१ धावांची नाबात शतकी खेळी करणाऱ्या हरमनप्रीत कौरसोबतचसलामवीर डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना आणि कर्णधार मिताली राजच्या खेळीने हुसैन प्रभावित झाला आहे.स्मृती मंधानाने इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ९० धावांची दमदार खेळी केली होती, हे इंग्लंडने विसरुन चालणार नाही. तसेच मिताली कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ दाखवण्याची क्षमता असणारी खेळाडू आहे, असा उल्लेक हुसेनने आपल्या कॉलममध्ये केलाय. महिला क्रिकेट जगतात भारतीय संघाने आतापर्यंतचा सर्वात चांगला खेळ दाखवला आहे. क्रिकेटसाठी ही फारच चांगली गोष्ट असून मितालीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात विश्वचषक जिंकण्याची क्षमता असल्याचा उल्लेख त्याने केला आहे.