मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात केली आहे. एका क्षणाला भारताची सामन्यावर मजबूत पकड होती. हरमनप्रीत कौर आणि पुनम राऊत यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारत विजयाच्या नजीक येऊन पोहचला होता. हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर पुनमने वेदा कृष्णमुर्तीच्या सहाय्याने भारताचा डाव सावरला. मात्र पुनम राऊत बाद झाल्यानंतर जणू भारतीय डावाला घसरगुंडी लागली, ती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज आपली विकेट फेकत गेल्या, त्यात मोक्याच्या क्षणी इंग्लिश गोलंदाज भारतीय महिलांवर दबाव टाकण्यात यशस्वी झाल्या. ज्याचा परिणाम म्हणून इंग्लंडने भारतावर अंतिम फेरीत ९ धावांनी मात केली.

भारताकडून पुनम राऊत आणि हरमनप्रीत कौरने झुंजार आणि कौतुकास्पद खेळी केली. पुनम राऊतने महत्वाच्या सामन्यात ८६ धावांची झुंजार खेळी केली. तिला हरमनप्रीत कौरने ५२ धावा काढून चांगली साथ दिली, मात्र या दोघींचा अपवाद वगळात मधल्या फळीतल्या एकाही भारतीय फलंदाजाने जबाबदारीने खेळ केला नाही. ज्याचा फायदा साहजिकपणे इंग्लंडच्या गोलंदाजांनी घेतला. सुरुवातीच्या काही तासांमध्ये दबावाखाली दिसणाऱ्या इंग्लंडच्या महिला गोलंदाज सामन्याच्या उत्तरार्धात अचानकपणे आक्रमक दिसायला लागल्या. इंग्लंडकडून अॅना शर्बसोलने ६ भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. अंतिम फेरीतला अॅनाची ही गोलंदाजी आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजी मानली जात आहे. दुसऱ्या बाजूने अॅलेक्स हार्टलेने २ बळी घेत तिला चांगली साध दिली. भारतीय डावात २ फलंदाज धावचीत झाल्या, यावरुन महत्वाच्या क्षणी भारतीय महिलांनी केलेल्या हाराकिरीची आपल्याला कल्पना येत असेल.

त्याआधी इंग्लंडने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अडखळती सुरुवात झाली आहे. सलामीवीर स्मृती मंधाना अंतिम सामन्यातही निराशाजनक खेळ करत माघारी परतली आहे. यानंतर कर्णधार मिताली राज आणि पुनम राऊत यांनी ३८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात ती धावबाद झाली.

यानंतर मराठमोळ्या पुनम राऊत आणि उपांत्य सामन्यातल्या शतकवीर हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी भागीदारीमुळे अंतिम सामन्यात भारताचा डाव सावरलेला . पुनम आणि हरमनप्रीतने तिसऱ्या विकेटसाठी तब्बल ९५ धावांची भागीदारी केली.  मिताली राज बाद झाल्यानंतर भारतीय संघाची कमान सांभाळत संघाचं शतक फलकावर लावलं. महत्वाची गोष्ट म्हणजे आपला उपांत्य सामन्यातला फॉर्म कायम ठेवत हरमनप्रीत कौरने अंतिम सामन्यातही अर्धशतक साजरं केलं. ८० चेंडुंमध्ये ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने हरमनप्रीतने ५१ धावांची खेळी केली.

मात्र या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीचं कौतुक नक्कीच करावं लागेल. आपल्यापेक्षा  मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत भारतीय महिलांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. मिताली राज, हरमनप्रीत कौर, पुनम राऊत, झुलन गोस्वामी, एकता बिश्त यांच्यासारख्या चांगली कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडू समोर आल्या आहेत.

त्याआधी इंग्लंडने भारतीय महिलांसमोर २२९ धावांचं आव्हान ठेवलं. ठराविक अंतराने इंग्लंडच्या एक-एक फलंदाज माघारी परतल्या, त्यामुळे इंग्लडला मोठी धावसंख्या उभारता आलीच नाही. नतालिया सिवर आणि सारा टेलरचा अपवाद वगळता कोणत्याही इंग्लिश महिला फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा सामना केलाच नाही. सुरुवातीपासून सामन्यावर भारतीय गोलंदाजांची पकड होती. मात्र सलामीवीरांनी करुन दिलेल्या सावध सुरुवातीचा फायदा इंग्लंडच्या संघाला उचलता आला नाही.

राजेश्वरी गायकवाडने इंग्लडची सलामीची जोडी फोडून भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पाठोपाठ पुनम यादवने इंग्लंडच्या २ फलंदाजांना माघारी धाडत यजमान संघाची अवस्था केविलवाणी केली. कर्णधार हेदर नाईटही या महत्वाच्या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करु शकली नाही. मात्र यानंतर सारा टेलर आणि नतालिया सिवरने चौथ्या विकेटसाठी ८३ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान इंग्लंडच्या दोन्ही फलंदाजांनी काही चांगले फटके खेळले. या दोन्ही फलंदाज इंग्लंडची नौका पार करुन देणार असं वाटत असतानाच झुलन गोस्वामीने लागोपाठ २ चेंडुंवर २ बळी मिळवत इंग्लंडला पुन्हा धक्का दिले. यातून नंतर इंग्लंडचा संघ कधी सावरलाच नाही. इंग्लंडकडून नतालिया सिवरने एकट्याने भारतीय गोलंदाजीचा सामना करत अर्धशतक झळकावलं. यानंतर सातव्या आणि आठव्या विकेटसाठी ३२ धावांच्या दोन भागीदाऱ्या झाल्यामुळे इंग्लंडच्या संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडला.

भारताकडून झुलन गोस्वामीने ३ बळी घेत इंग्लंडच्या संघाचं कंबरडच मोडलं. आपल्या १० षटकांमध्ये झुलन गोस्वामीने केवळ २३ धावा दिल्या. गोस्वामीनाल दिप्ती शर्मा २ बळी आणि राजेश्वरी गायकवाडने १ बळी घेत चांगली साथ दिली. याव्यतिरीक्त शिखा पांडे, दिप्ती शर्मानेही टिच्चून मारा करत इंग्लिश फलंदाजांना फार मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.

[matchcode-to-post id=”enwinw07232017183493″]

 

  • अखेर रंगतदार सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव करत, इंग्लंडचा महिला संघ जगज्जेता
  • तळातल्या फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, एकामागोमाग  एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच
  • भारताचा डाव पुन्हा घसरला, वेदा कृष्णमुर्ती माघारी, सहा फलंदाज माघारी
  • पुनम राऊतला माघारी धाडण्यात अॅना शर्बसोलला यश
  • अंतिम सामन्यात पुनम राऊतला सूर सापडला, भारताचा डाव सांभाळत झुंजार अर्धशतकी खेळी
  • मराठमोळ्या पुनम राऊतने हरमनप्रीतच्या साथीने भारताचा डाव सावरला, दोघींमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात कर्णधार मिताली राज माघारी
  • कर्णधार मिताली राज आणि पुनम राऊतचा भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • भारताची अडखळती सुरुवात, स्मृती मंधाना स्वस्तात माघारी
  • तळातल्या फलंदाजांची चांगली झुंज, भारताला अंतिम सामन्यात २२९ धावांचं आव्हान
  • दिप्ती शर्माच्या अचूक फेकीवर आणखी एक खेळाडू माघारी, इंग्लंडला सातवा धक्का
  • तळातल्या फलंदाजांकडून इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • झुलन गोस्वामीने सिवरला माघारी धाडत इंग्लंडला सहावा धक्का दिला.
  • नतालिया सिवरची एकाकी झुंज, सिवरचं संयमी अर्धशतक
  • महत्वाच्या सामन्यात इंग्लंडचा निम्मा संघ माघारी, संघाची अवस्था बिकट
  • झुलन गोस्वामीचे इंग्लंडच्या संघाला पुन्हा धक्के, लागोपाठ २ चेंडुंवर २ फलंदाजांना धाडलं माघारी
  • सारा टेलर आणि नतालिया सिवरची चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, संघाचं शतक फलकावर
  • लागोपाठ बसलेल्या धक्क्यानंतर इंग्लडच्या संघाचा डाव सावरला
  • कर्णधार हेदर नाईट पुनम यादवच्या गोलंदाजीवर माघारी
  • इंग्लिश फंलदाज भारतीय महिलांच्या फिरकीच्या जाळ्यात
  • पाठोपाठ टॅमी बेमाँटही पुनम यादवच्या गोलंदाजीवर माघारी
  • अखेर राजेश्वरीनेच इंग्लडी पहिली जोडी फोडली, लॉरेन विनफिल्ड माघारी
  • मात्र फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडवर इंग्लिश फलंदाजांचा हल्लाबोल
  • इंग्लंडच्या धावगतीवर अंकुश लावण्यात भारताला यश
  • सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय महिला गोलंदाजांचा टिच्चून मारा