भारताच्या महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यास २०११ मधील भारताच्या पुरुष संघाच्या विजयापेक्षा हे यश मोठे असेल असे मत भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने मांडले आहे. आयपीएल किंवा ऑस्ट्रेलियातील महिलांच्या बिग बॅश लीगसारखी स्पर्धा भारतात आयोजित केल्यास महिला क्रिकेटला आणखी चालना मिळेल असेही गंभीरने म्हटले आहे.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौतम गंभीरने महिला संघाच्या कामगिरीचे भरभरुन कौतुक केले. महिला संघाच्या कामगिरीने देशातील अनेक मुलींना प्रोत्साहन दिले. आता मुली मोठ्या प्रमाणात क्रिकेटकडे वळतील. ‘चक दे’नंतर पहिल्यांदाच देशात असे चित्र आहे. संघातील १६ महिला खेळाडूंनी देशाला प्रेरणा दिली. यापूर्वी महिला क्रिकेटकडे लक्ष देणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. पण आता हाच महिला संघ इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहे असे सांगत गंभीरने महिला संघाचे कौतुक केले. रविवारच्या फायनलमध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास महिला संघाचा हा विजय २०११ वर्ल्डकपमधील पुरुष संघाच्या विजयापेक्षा मोठे यश असेल असे वाटत असल्याचे गंभीर म्हणतो. मुली इंग्लंडमध्ये गेल्या, त्या देशातील हवामान वेगळे आहे. त्यांना फारशी संधीदेखील मिळाली नव्हती असे गंभीरने नमूद केले.

महिला क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आर्थिक सुरक्षा असल्याचे गंभीरने सांगितले. पुरुषांप्रमाणेच महिलांना मानधन देणे बीसीसीआयसाठी कठीण आहे. पण पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या मानधनातील तफावत कमी होणे गरजेचे आहे असे गंभीरने स्पष्ट केले. महिला संघाने वर्ल्ड कप जिंकल्यास महिलांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता वाढेलच. पण त्यांनी वर्ल्ड कप जिंकला नाही तरी देशात महिला संघाने स्वतःची छाप पाडली हे नक्की असे गंभीरने म्हटलंय.

पुरुषांसाठी जशी आयपीएल स्पर्धा असते तशीच स्पर्धा महिलांसाठी सुरु करण्याची गरज आहे. यातून महिला क्रिकेटपटूंचा आर्थिक फायदा होईलच. पण त्याचसोबत महिला क्रिकेटपटूंसाठी नवीन संधी निर्माण होईल. तसेच परदेश दौऱ्यांमध्ये महिला क्रिकेटपटूंना अशा लीगमध्ये खेळल्याने फायदा होईल असे गंभीरचे म्हणणे आहे.

महिलांच्या आयपीएलसाठी प्रायोजक आणि संघमालक उत्सुक असतील का असा प्रश्न विचारला असता गंभीर म्हणाला, पुरुषांच्या आयपीएलमध्ये संघ खरेदी करणारे महिलांच्या आयपीएलसाठीही तितकेच उत्सुक असतील याची मला खात्री आहे. महिला क्रिकेटपटूंना मदत करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे त्याने सांगितले.