दुखापतीतून सावरुन विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्मृती मंधानाने विश्वचषकात सुरुवातीलाच दमदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पुनम राऊतच्या साथीने तिने ७२ चेंडूत ९० धावांची खेळी केली होती. या खेळीत तिने ११ चौकार आणि २ षटकार खेचले होते. त्यानंतर हीच लय  कायम ठेवत डावखुऱ्या मंधानाने गुरुवारी झालेल्या सामन्यात कारकिर्दीतील सहावे शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात तिने १०८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने तिने १०६ धावांची नाबाद खेळी केली. भारताकडून पहिल्यांदाच विश्वचषकात संधी मिळालेल्या मंधानाचे विश्वचषकातील हे पहिलेच शतक आहे. पहिल्या सामन्यात अवघ्या १० धावांनी तिचे शतक हुकले होते. तसेच एकदिवसीय सामन्यातील आतापर्यंतची तिची ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या देखील आहे.

मुळची सांगलीची असणारी मंधाना ही भारतीय महिला क्रिकेटर्समध्ये द्विशतक करणारी पहिली क्रिकेटर आहे. तिने २०१३ मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना १५० चेंडूत २२४ धावांची खेळी केली होती. गुजरात विरुद्ध वडोदराच्या मैदानात तिने हा करिश्मा केला होता. मंधानाने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला आंतराराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्यानंतर २०१६ मध्ये जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. भारतीय संघात दमदार सलामीवीर म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या मंधानाला २०१६ च्या आयसीसीच्या महिला संघामध्ये स्थान मिळाले होते. आंतराष्ट्रीय क्रिकेटमंडळाकडून जारी करण्यात येणाऱ्या संघात स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. भारतीय संघाचे या स्पर्धेत दोन सामने झाले असून दोन्ही सामन्यातील भारताची कामगिरी  ही समाधानकारक आहे. मंधानाचा दोन्ही सामन्यातील खेळ कायम राहिल्यास भारतीय संघ या स्पर्धेत करिश्मा करेल, असे म्हटल्यास वावगे, ठरणार नाही.