ICC च्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. २०२१ साली होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद न्यूझीलंडकडे असणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ खेळणार असून ३० जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना असे सर्व सामने पकडून या स्पर्धेत एकूण ३१ सामने रंगणार आहेत.

न्यूझीलंडला स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे ICC विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळण्याची ही चौथी वेळ आहे. या आधी १९९२ आणि २०१५ ची पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आणि २००० साली झालेली महिला विश्वचषक स्पर्धा न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आली होती. त्यानंतर २०२१ चा महिला विश्वचषक येथे खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी यजमान न्यूझीलंड आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल ४ संघ थेट पात्र ठरतील. सध्या ऑस्ट्रेलिया (२२), इंग्लंड (२२), भारत (१६) आणि दक्षिण आफ्रिका (१६) हे अव्वल चार संघ आहेत. याशिवाय स्पर्धेतील इतर ३ संघांसाठी दरम्यानच्या काळात पात्रता स्पर्धा खेळण्यात येणार आहेत.