ICC Women’s World T20 – महिला विश्वचषक स्पर्धेत आज आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ५२ धावांनी विजय मिळवला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अनुभवी मिताली राजने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आयर्लंडपुढे १४६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ केवळ ९३ धावाच करू शकला.

नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून अनुभवी सलामीवीर मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी ६७ धावांची सलामी दिली. पण ३३ धावांवर स्मृतीला तंबूत परतावे लागले. त्यानंतर मितालीने एकाकी झुंज सुरू ठेवली, पण तिला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. रोड्रीग्जच्या १८ आणि दीप्ती शर्माच्या ११ धावा केल्या. मात्र मितालीने आपला अनुभव पणाला लावून भारताला १४५ धावांपर्यंत पोहोचवले.

या आव्हानाचा पाठलाग करत असताना आयर्लंडच्या संघाला मोठ्या भागीदारी करता आल्या नाहीत. सलामीवीर लेव्हीस ९ धावांवर बाद झाली. शिलिंगटन हिने २३ धावा करून आयर्लंडच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण तीदेखील तंबूत परतली. जॉयस हिने डावाला चांगली सुरुवात केली होती, मात्र तीदेखील ३३ धावांवर बाद झाली. त्यानंतर मात्र आयर्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.