पुरुषांप्रमाणेच महिलांच्या क्रिकेटलाही आता चांगली प्रसिद्धी मिळत असून त्यांचाही चांगला प्रेक्षकवर्ग निर्माण होत आहे. नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषकातील प्रेक्षकांच्या संख्येवरून ही गोष्ट लक्षात येते. महिला विश्वचषकाला या वेळी जवळपास अडीच कोटी (२,४५,०००) प्रेक्षक फक्त भारतात लाभले, तर अमेरिकेमध्ये सरासरी एक लाख प्रेक्षकांनी विश्वचषकाचे सामने पाहिल्याचे निदर्शनास आले आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला समितीकडून एक अहवाल आला आहे. या अहवालानुसार भारतामध्ये एकूण २.४५ कोटी प्रेक्षकांनी सामना दूरदर्शन वाहिन्यांवर पाहिला, तर अमेरिकेमध्ये प्रत्येक सामन्याला सरासरी एक लाख प्रेक्षकांनी या सामन्याचा दूरदर्शन वाहिन्यांवरून आनंद लुटला,’’ असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.
आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळेने सांगितले की, ‘‘वेगवेगळ्या गोष्टींवर सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा क्रिकेट जगतामध्ये होताना दिसत आहे. साऱ्या सदस्यांनी जो काही सहयोग दिला त्यामुळेच हे सारे होत असून मी त्यांचे धन्यवाद मानू इच्छितो.’’
आयसीसीच्या सुरू असलेल्या बैठकीमध्ये कसोटी क्रिकेटवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये भविष्यातील कसोटी क्रिकेटचा आराखडा बनवण्यात आला असून या गोष्टीला सर्वानी सकारात्मक पाठिंबा दिला आहे. कसोटी क्रिकेटची वाढ कशी करता येईल आणि प्रोत्साहन कसे देता येईल, यावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटचा स्पर्धात्मक आराखडा कसा असावा, खेळपट्टय़ा कशा असाव्यात, त्याचबरोबर या गोष्टींचे
विपणन कसे करता येईल, यावरही चर्चा झाली.