भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय प्रकाराप्रमाणेच कसोटीतही ‘आयसीसी’ जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली आहे.

कोहलीच्या खात्यात सर्वाधिक ९२८ गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील स्टीव्ह स्मिथपेक्षा (९११) तो १७ गुणांनी पुढे आहे. त्यामुळे वर्षांखेरीसपर्यंत तरी कोहलीच्या अग्रस्थानाला कोणताही धोका नाही. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन (८६४) आणि भारताचा चेतेश्वर पुजारा (७९१) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहे. युवा मार्नस लबूशेन (७८६) पाचव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानच्या बाबर आझमने (७६७) श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या सलग दोन शतकांमुळे सहावा क्रमांक पटकावला असून रहाणे ७५९ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने (८९८) अग्रस्थान कायम राखले असून भारताचा जसप्रीत बुमरासुद्धा (७९४) सहाव्या क्रमांकावर टिकून आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत भारताच्या रवींद्र जडेजाने दुसरे स्थान कायम राखले असून विंडीजचा जेसन होल्डर अग्रस्थानावर आहे.