News Flash

अफगाण संघाने मने जिंकली आता विश्वचषक कोण जिंकणार?

तालिबान्यांनी उद्ध्वस्त केलेल्या देशातून येऊन सामने खेळणाऱ्या अफगाण संघाची जिगर सगळ्यांची मने स्पर्शून गेली.

मैदानातून
नितीन मुजुमदार – response.lokprabha@expressindia.com

तालिबान्यांनी उद्ध्वस्त केलेल्या देशातून येऊन सामने खेळणाऱ्या अफगाण संघाची जिगर सगळ्यांची मने स्पर्शून गेली. आपली कामगिरीही चांगली झाली असली तरी आपले विराट कोहलीवर अवलंबून राहणे फार वाढले आहे.

इंग्लंडमधल्या विश्वचषक स्पध्रेचा पूर्वार्ध भारतासाठी सर्व सामन्यांत उत्तम कामगिरी केल्यामुळे चांगला गेला ही एक बाब वगळली तर क्रिकेट रसिकांसाठी फारसा उत्कंठावर्धक नव्हता. अपेक्षित संघांचेच विजय, बहुसंख्य सामने एकतर्फी आणि त्यात पावसाच्या सावटाने स्पध्रेवर सतत टांगती तलवार यामुळे या स्पध्रेचा पूर्वार्ध तसा नीरस होता. याउलट उत्तरार्धात वरुणराजा काहीसा थकला, इंग्लंडमधल्या खेळपट्टय़ाही मंदावल्या, मात्र अनेक सामने खूप चुरशीचे झाले आणि त्यामुळे ‘टॉप फोर’साठी स्पध्रेत प्रथमच उत्सुकता निर्माण झाली!

अफगाणिस्तानच्या संघाने भलेही तळ गाठला असेल, पण बुडताना त्यांनी भारत व पाकिस्तानसारख्या तगडय़ा संघांना जवळजवळ अस्मान दाखविले! अस्वस्थ सामाजिक परिस्थिती, तुटपुंजी साधने, विदीर्ण मने या साऱ्या पाश्र्वभूमीवर एखाद्या नवख्या दिग्दर्शकाने अननुभवी पात्रे हाताशी धरून साध्या सेटवर एखाद्या चित्रपटाची निर्मिती करावी आणि त्या चित्रपटाला ऑस्करसाठी तरी दोन मानाची नॉमिनेशन्स मिळावीत असाच काहीसा प्रकार अफगाणिस्तानच्या संघाबद्दल झाला असे म्हणावे लागेल. स्पध्रेच्या बाद फेरीत अफगाणिस्तान नसले तरी या स्पध्रेच्या इतिहासाची नोंद करताना क्रिकेटपंडित या नवख्या संघासाठी विशेष पाने ठेवणार हे नक्की. तालिबान राजवटीत २००० सालापर्यंत अफगाणिस्तानात इतर सर्व खेळांसह क्रिकेटवरदेखील बंदी होती. २००१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी हस्तक्षेपानंतर क्रिकेटने मूळ धरायला सुरुवात केली. आज अफगाणिस्तान संघातील बहुतेक सारे खेळाडू हे अफगाण निर्वासितांच्या छावण्यांत वाढले आहेत हे लक्षात घेतले तर या संघाची मजल किती मोठी आणि कौतुकास्पद आहे ते लक्षात येते. अफगाण संघाच्या या खास कामगिरीची खास दखल चक्क ‘वॉिशग्टन पोस्ट’नेदेखील घेतली आहे. ‘द मोस्ट इनस्पायरिंग वर्ल्डकप स्टोरी धिस मंथ इज नॉट यू वुड एक्स्पेक्ट’ हे शीर्षक असलेला एक सुंदर लेख  वॉिशग्टन पोस्टने प्रकाशित केला आहे. अफगाणिस्तानच्या पुनíनर्माणात भारताची मोठी मदत होत आहे. अफगाण संसदेच्या इमारतीपासून अफगाणिस्तानमधील  क्रिकेटच्या पायाभूत सुविधांपर्यंत अनेक गोष्टींच्या निर्मितीत भारताने सहकार्याचा हात पुढे केला आहे. अगदी आता आता बाळसं धरणाऱ्या अफगाण क्रिकेटच्या गुटगुटीतपणामध्येदेखील ‘अमूल’च्या स्पॉन्सरशिपरूपी आहाराचा मोठा वाटा असणार!!

२०१६-१७ मध्ये अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या माजी कसोटीवीर लालचंद राजपूत यांच्याशी यानिमित्ताने फोनवर खास बातचीत केली. ते सध्या आर्यलडच्या दौऱ्यावर असलेल्या झिम्बाब्वे संघाचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. अफगाणिस्तान संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, ‘अफगाण खेळाडू प्रचंड मेहनती आहेत. मी त्यांना मैदानाला चार फेऱ्या मारायला सांगितल्या तर ते सहा फेऱ्या मारून दाखवत. रेहमत शाह हा तंत्रदृष्टय़ा अगदी परिपूर्ण फलंदाज आहे’ राजपूत पुढे म्हणाले, ‘अफगणिस्तानमधील िहसक कालखंडानंतर हे चांगले दिवस क्रिकेटनेच आपल्याला दाखविले आहेत याचीही त्यांना पूर्ण जाणीव आहे.’ लालचंद राजपूत यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळातच अफगणिस्तानला कसोटी दर्जा मिळाला. ‘त्या काळात मला माझ्या पद्धतीने काम करायचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. याच काळात बांगलादेश वगळता आम्ही सर्व सहयोगी सदस्यांशी झालेले सामने जिंकलो,’ राजपूत सांगतात.

या विश्वचषक स्पध्रेत प्रत्येक डावात ३०० हून अधिक धावा होतील असा अनेक जाणकारांचा अंदाज होता. कारण या विश्वचषकाआधी झालेल्या इंग्लंड-पाक मालिकेत पाचही सामन्यांत दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडला होता. मात्र विश्वचषक स्पध्रेत असे काही घडले नाही. काही सामन्यांमध्ये धावसंख्या भरपूर झाली.

भारतीय गोलंदाजांनी या स्पध्रेत पहिल्या आठ लीग सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली. भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच नियमित संघात असलेल्या सर्व गोलंदाजांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करिअरमधील प्रति विकेट सरासरी २५ धावांपेक्षा कमी आहे! बुमराहसारख्या अतिशय महत्त्वाच्या अस्त्रास यापुढे अतिशय जपून वापरावे लागणार आहे. विश्वचषकानंतर होणाऱ्या िवडीज दौऱ्यात त्याला विश्रांती दिली ते योग्यच. शमीचे जोरदार पुनरागमन सुखावह आहे. आता शमी -भुवीमध्ये जोरदार चुरस एका जागेसाठी होणार. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जलद गोलंदाजाच्या जागेसाठी एवढी तीव्र स्पर्धा प्रथमच होत असेल. विजय शंकर हा चांगला अष्टपलू खेळाडू असला तरी या महत्त्वाच्या स्पध्रेत त्याला एवढय़ा कमी अनुभवाच्या आधारे चौथा क्रमांक देणे वादग्रस्त ठरले. तो गोलंदाजीदेखील करतो, पण त्या दृष्टीने त्याचा पुरेसा वापर होऊ शकला नाही, तशी परिस्थितीही नव्हती. माझ्या मते पंतला स्पध्रेत सुरुवातीपासून संधी मिळायला हवी होती. त्याच्यासारख्या खेळाडूला संधी देणे म्हणजे दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणूकीची तजवीज. इंग्लंडविरुद्ध त्याला संधी मिळाली हे उत्तम. विराट कोहलीबद्दल काय लिहावे? या माणसाचे खेळातले कौशल्य, मनोधर्य, चिकाटी, एकाग्रता सारे काही विशेषच. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी हा प्रतिस्पध्र्याना सहसा पुरूनच उरतो. फाटक्या जीन्स घालणाऱ्या पिढीचा तो रोल मॉडेल असला तरी त्याचा प्रत्येक डाव म्हणजे एक सुंदर विणलेले तलम वस्त्र असते. अगदी हाणामारीच्या वेळीदेखील त्याची बॅट नजाकतदार एकेरी दुहेरी धावांवर भर देत लक्ष्य गाठते. चौकार षटकारांच्या  उत्सवाचे आम्हाला वावडे नाही. योग्य त्या वेळी हे सणही ‘विराट’ कारकीर्दीत साजरे होत असतात. सर नेव्हिल कार्ड्स यांनी आपल्या ‘क्रिकेट ऑल द इअर’ या पुस्तकात ब्रॅडमनवर लिहिताना म्हटले आहे, ‘इन हिज हे डे, नो नोन स्पेशीज ऑफ बॉलर कुड कीप हिम क्वाएट ऑर स्टे हिज कोर्स, अ‍ॅण्ड डिस्पाइट द पेस ऑफ हिज स्कोअरिंग ही हार्डली एव्हर लिफ्टेड द बॉल अनब्युटिफुली.’ क्रिकेटच्या ब्रिटिश भाषाप्रभूने केलेले हे वर्णन विराटलाही तंतोतंत लागू होते. रोहित शर्मा थोडय़ा संयमाने खेळावयास लागला ही या विश्वचषकातील भारतीय संघाच्या फलंदाजीसाठी महत्त्वाची बाब. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांवरच भारतीय फलंदाजी खूप अवलंबून आहे ही बाब काहीशी काळजीचीच. बाकी या स्पध्रेत रोहितचे शतकांचे सातत्य संघाला गरजेचे  आहे. सतत स्ट्राइक रोटेट ठेवत धावफलक हलता ठेवण्यात कोहलीचा हात कोणी धरू शकणार नाही. िहसक फलंदाजी न करता, म्हणजे अर्थातच फारसे षटकार न मारता टेक्स्ट बुक क्रिकेट जास्त प्रमाणावर खेळूनदेखील उत्तम स्ट्राइक रेटने धावा काढता येतात हे विराटने जगाला दाखवून दिले आहे. त्याच्यावर भारतीय संघ किती अवलंबून आहे याचे एक उदाहरण पाहा. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहली खेळत होता तोपर्यंत आपण निदान पावणेतीनशेच्या आसपास जाऊ असे वाटत होते. कोहलीने त्या डावात शंभरहून अधिक स्ट्राइक रेटने ६७ धावा केल्या. मात्र भारतीय डावात त्यानंतरचा सर्वोत्तम स्ट्राइक रेट होता केदार जाधवचा, ६८ चेंडूंत ५२ म्हणजे ७६.४७ एवढा. कोहली बाद झाल्यावर भारताने १४ ओव्हर्स मध्ये ५७ धावा केल्या. भारताचे हे विराटवर अवलंबून राहणे निदान एकदिवसीय क्रिकेटमध्ये, अलीकडे फार वाढलेले दिसत आहे.

स्पध्रेतून श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज हे संघही अफगाणिस्तानबरोबरच स्पध्रेबाहेर गेले आहेत. श्रीलंकेचे बाहेर जाणे अनपेक्षित नव्हते. गेले काही दिवस हा संघ फॉर्ममध्ये नाही. वेस्ट इंडिजने ठरावीक टप्प्यांवर चांगली कामगिरी केली, पण ती पुरेशी नव्हती. दक्षिण आफ्रिकेचे स्पध्रेबाहेर जाणे धक्कादायक आणि दु:खद आहे. चोकर्स म्हणून ओळखला जाणारा हा संघ या वेळी स्टार्टर म्हणूनही गणला जाऊ शकला नाही.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:04 am

Web Title: icc world cup 2019 afghanistan cricket team won the hearts of cricket fans icc world cup 2019 afghanistan cricket team cricket fans icc cricket world cup 2019 lokprabha marathi weekly magazine
Next Stories
1 ब्रायन लारा यांना ‘डी.वाय’ची डॉक्टरेट
2 Cricket World Cup 2019 : पाकिस्तानची ‘घरवापसी’
3 Cricket World Cup 2019 : वातावरणाशी समरस झाल्यास सातत्यपूर्ण कामगिरी साकारते!
Just Now!
X