विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; गुलाबदीन नैबकडे नेतृत्व

वेगवान गोलंदाज हमिद हसन आणि माजी कर्णधार असगर अफगाण यांचे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या संघात अनपेक्षित पुनरागमन झाले आहे. राशिद खान, मुजीब उर रहमान व मोहम्मद नबी अशा प्रतिभावान फिरकीपटूंचा समावेश असलेल्या अफगाणिस्तानच्या १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व गुलाबदीन नैबकडे सोपवण्यात आले आहे.

३१ वर्षीय हसन जुलै २०१६मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला आहे. त्यामुळे जवळपास तीन वर्षांनंतर अचानक त्याची संघात निवड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मांडीच्या दुखापतीमुळे हसनला बराच काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. ३२ एकदिवसीय सामन्यांत हसनच्या नावावर ५६ बळी जमा आहेत.

काही दिवसांपूर्वीच असगरकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील नेतृत्व काढून घेण्यात आले. त्यामुळे आता २८ वर्षीय अष्टपैलू गुलाबदीन संघाचे नेतृत्व कशाप्रकारे करतो, हे पाहणे रंजक ठरेल. फलंदाजीत मोहम्मद शहझाद आणि हश्मतुल्लाह झझाई यांच्यावर अफगाणिस्तानची प्रामुख्याने मदार असेल. तर विश्वातील कोणत्याही फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवण्याची क्षमता असलेल्या राशिद, मुजीब व नबी या फिरकी त्रिकुटाची कामगिरी अफगाणिस्तानचे स्पर्धेतील भवितव्य ठरवेल.

‘‘हसनच्या पुनरागमनामुळे आम्ही आनंदी आहोत. मात्र विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यात येईल. निवड समितीने निवडलेले १५ खेळाडू हे सर्वोत्तम असून आमचे फिरकीपटू अव्वल दर्जाचे आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला कोणीही कमी लेखू नये,’’ असे अफगाणिस्तान निवड समितीचे अध्यक्ष दौलत खान यांनी सांगितले.

अफगाणिस्तान संघ

गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हश्मतुल्ला झझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हश्मतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समिउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, अफताब आलम, हमिद हसन आणि मुजीब उर रहमान.