20 November 2019

News Flash

World Cup 2019 : फॅनसाठी काहीपण! वॉर्नरने छोट्या चाहत्याला दिला चक्क सामनावीराचा किताब

डेव्हिड वॉर्नरच्या या कृत्याने साऱ्यांची मनं जिंकली

विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरचे दमदार शतक आणि पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर मात केली. सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर ३०७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने दमदार शतक झळकावले. वॉर्नरने १११ चेंडूत १०७ धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नरने ११ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यालाच सामनावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले. पण त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने जे केले, त्यामुळे त्याने साऱ्यांची मनं जिंकली. स्टेडियममध्ये काही ऑस्ट्रेलियन चाहते होते. ते चाहते वॉर्नरची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. त्यापैकी एका छोट्या चाहत्याला सुखद धक्का बसला. वॉर्नरने थेट आपला सामनावीराचा किताबच त्या छोट्या चाहत्याला देऊन टाकला.

या अनुभवाबाबत विचारल्यानंतर तो छोटा चाहता म्हणाला की आम्ही केवळ येथे ध्वज घेऊन उभे होतो आणि चिअर करत होतो. त्यावेळी अचानक वॉर्नर आला आणि त्याने मला त्याचा पुरस्कारच देऊन टाकला. मी डेव्हिड वॉर्नरचा खूप मोठा चाहता आहे आणि ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला याचा मला आनंद आहे, असेही चिमुरड्याने सांगितले.

सामन्यात आधी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचं शतक आणि त्याला कर्णधार अरॉन फिंचने ८२ धावांची खेळी करुन दिलेल्या साथीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ३०७ धावांपर्यंत मजल मारली.  आश्वासक सुरुवातीनंतर एका क्षणाला ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा पल्ला गाठेल असं वाटतं होतं, मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे कांगारुंचा संघ मोठी मजल मारु शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने कांगारुंचा निम्मा संघ बाद केला.

दरम्यान नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या आक्रमणातही हवाच काढून घेतली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिरने ऑस्ट्रेलियन कर्णधार अरॉन फिंचला माघारी धाडत कांगारुंना पहिला धक्का दिला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने स्मिथच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

मात्र स्टिव्ह स्मिथ आणि पाठीमागून आलेला ग्लेन मॅक्सवेल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. दरम्यानच्या काळात वॉर्नरने आपलं शतक साजरं केलं. मात्र १०७ धावांवर तो ही माघारी परतला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकण्यास सुरुवात केली. मोहम्मद आमिर, शाहिन आफ्रिदी यांनी भेदक मारा करत कांगारुंची अखेरची फळी कापून काढली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरच्या ५ बळींव्यतिरीक्त शाहिन आफ्रिदीने २ तर हसन अली-वहाब रियाझ-मोहम्मद हाफिज यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

First Published on June 13, 2019 4:21 pm

Web Title: icc world cup 2019 aus vs pak australia batsman david warner gift man of the match small australian kid fan vjb 91
Just Now!
X