इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरु असून विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात विंडीजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवला. उत्तम लयीत असलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा होती, पण शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस आणि आंद्रे रसल या तिघांनी त्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. १५ या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला पहिला गडी गमवावा लागला. थॉमसने फिंचला ६ धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरला कॉट्रेलने तंबूचा रस्ता दाखवला. वॉर्नरला केवळ ३ धावा करता आल्या. त्याचा काटा काढल्यानंतर कॉट्रेलने झकासपैकी त्याला लष्करी परेड करून आणि सॅल्यूट करून अलविदा म्हटले.

त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न आंद्रे रसलने हाणून पाडला. बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळण्याचा मोह ख्वाजाला आवरला नाही. त्याने फटका खेळला. पण त्याच्या बॅटची कड लागून चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला. यष्टीरक्षक शाय होप याने अप्रतिम उडी मारून त्याचा झेल टिपला. ख्वाजा १९ चेंडूत २ चौकरांसह १३ धावा केल्या. त्यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलही २ चेंडू खेळून बाद झाला. त्यानंतरही त्याने झकासपैकी सॅल्यूट मारून सेलिब्रेशन केले आणि त्याला ‘बाय-बाय’ केले.

या दमदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाची अवस्था डावाच्या सुरूवातीला ४ बाद ३८ अशी झाली होती.

दरम्यान, कॉट्रेल हा जमैकाच्या संरक्षण विभागाचा सदस्य आहे, त्यामुळे तो जेव्हा सॅल्यूट करतो तेव्हा तो त्याच्या सहकाऱ्यांचे आभार मानत असतो, असे स्पष्टीकरण विंडीजचे माजी खेळाडू इयन बिशप यांनी दिले आहे.