ICC World Cup 2019 या स्पर्धेसाठी टीम इंडियाची १५ एप्रिलला घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. या बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे. यावेळी ऋषभ पंत याला कार्तिकच्या जाहगी संधी देणे आवश्यक होते, असे मत अनेक क्रिकेट जाणकारांनी केली. पण कार्तिकला अनुभवाच्या जोरावर संघात स्थान मिळाल्याचे सांगण्यात आले. याबाबत बोलताना “मी कायम चर्चेत असतो”, असे मत दिनेश कार्तिकने व्यक्त केले आहे.

“मी संघात राहण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम घेत आहे. माझे कुटुंब किंवा माझे मित्र यांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्याबरोबर नसते, तर मी अजूनपर्यंत खेळताना दिसलो नसतो. माझ्याबद्दल चांगल्या वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक अशा दोनही प्रकारच्या चर्चा होतात. पण महत्वाचे म्हणजे लोक माझ्याबद्दल कायम चर्चा करतच असतात. याचाच अर्थ मी त्यांच्या चर्चेचा विषय असतो आणि याचा मला अभिमान आहे”, असे कार्तिक म्हणाला.

भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दिनेश कार्तिक याला वगळण्यात आले होते. याबाबत बोलताना कार्तिक म्हणाला, “त्या मालिकेत मला वगळण्यात आले याचे मलाही आश्चर्य वाटले होते. पण मला माझ्या नशिबावर विश्वास होता. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत मी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो. अखेर विश्वचषक स्पर्धेसासाठीच्या संघात मला स्थान मिळाले.”

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव
युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा