इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात कर्णधार आरोन फिंच याने दमदार शतक ठोकले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीस उतरलेल्या वॉर्नर – फिंच जोडीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतके केल्यानंतर वॉर्नर बाद झाला, पण कर्णधार फिंचने मात्र शतक ठोकत एक विक्रम केला.

सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉयनीस यांच्यात धाव घेताना प्रचंड गोंधळ दिसून आला. ४१ व्या षटकात स्मिथने आदिल रशिदने टाकलेला चेंडू टोलवला. त्याने पहिली धाव पूर्ण केली. पण दुसरी धाव घेताना त्यांच्यात गोंधळ दिसून आला. धाव घेताना दोघेही नॉन स्ट्राईकच्या दिशेला पोहोचले.त्यावेळी आदिल रशिदने शांतपणे चेंडू यष्टिरक्षकाकडे दिला आणि स्टॉयनीसला माघारी परतावे लागले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या दोघांनी दमदार फलंदाजी करत भक्कम सलामी दिली. १२३ धावांच्या सलामी भागीदारीनंतर वॉर्नर बाद झाला. त्याने ६१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याच्यानंतर फिंचने ख्वाजाच्या साथीने डाव पुढे नेला, पण ख्वाजा २३ धावा करून माघारी परतला. स्टोक्सने त्याच्या त्रिफळा उडवला. फिंचने मात्र दमदार शतक ठोकले. त्याने ११६ चेंडूत १०० धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी सजवली. पण मोठा मरताना तो झेलबाद झाला.

स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली. पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणी साथ देऊ शकले नाही. धोकादायक मॅक्सवेल १२ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टॉयनीसदेखील धावचीत होऊन माघारी परतला. अखेर शेवटच्या टप्प्यात स्मिथ फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने ३८ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला २८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडकडून वोक्सने २ तर आर्चर, वुड, स्टोक्स आणि अली यांनी १-१ बळी टिपला.