विंडीजच्या वेगवान गोलंदाजांसमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी सोमवारी शानदार फलंदाजी केली. अनुभवी मोहम्मद हफीझ, बाबर आझम आणि कर्णधार सर्फराज अहमद यांच्या दमदार अर्धशतकांना वहाब रियाझने अखेरच्या षटकांत केलेल्या प्रभावी माऱ्याची साथ लाभल्यामुळे पाकिस्तानने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत केले. त्यामुळे पाकिस्तानची सलग ११ पराभवांची मालिका खंडित झाली. जो रूट आणि जोस बटलर यांनी साकारलेली झुंजार शतके व्यर्थ ठरली.

पराभवाच्या दुःखात भर म्हणून इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि जेसन राॅय यामना महत्वाच्या खेळाडूला ICC च्या कारवाईला सामोरे जावे लागले. सामन्याच्या २७ व्या षटकात जोफ्रा आर्चरने आक्षेपार्ह हावभाव केले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. जोफ्रा आर्चररला त्याच्या सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. तसेच १४ व्या षटकात इंग्लंडचा खेळाडू जेसन रॉय याने एक चेंडू अडवला. पण त्याच्याकडून चेंडू अडवताना छोटीशी चूक झाली आणि चेंडू नीट पद्धतीने अडला नाही. त्यामुळे जेसन रॉय याने मैदानावरच आक्षेपार्ह शब्द वापरला. हा शब्द पंचांनीदेखील नीट ऐकला. त्यामुळे ICC त्याच्यावर कारवाई केली. ICC च्या आचारसंहितेतील पहिल्या स्तराच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे जेसन रॉयलाही सामन्याच्या मानधनातील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचे सलामीवीर फखर झमान आणि इमाम उल हक यांनी १४ षटकांत ८२ धावांची सलामी नोंदवली. मोईन अलीने ही जोडी फोडताना झमानला (३६) बटलरकरवी यष्टिचीत केले. त्याने इमामलाही ४४ धावांवर ख्रिस वोक्सकडे झेल देण्यास भाग पाडले. बाबर आणि हफीझ यांनी २ बाद १११ धावांवरून मोर्चा सांभाळला. दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ८८ धावांची भागीदारी रचली. मात्र मोईनने बाबरला ६३ धावांवर बाद केले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या सर्फराजने ४४ चेंडूंत ५५ धावा फटकावल्या, तर हफीझने ६२ चेंडूंत आठ चौकार व दोन षटकारांसह ८४ धावांची सुरेख खेळी साकारली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी आणखी ८० धावांची भर घातली. मार्क वूडच्या गोलंदाजीवर हफीझ माघारी परतला. अखेरच्या दोन षटकांत हसन अली आणि शादाब खान यांनी फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानने ५० षटकांत ८ बाद ३४८ धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंडने ३४९ धावांचा पाठलाग करताना जेसन रॉयला (८) लवकर गमावले. त्यानंतर आलेल्या जो रूटने लौकिकाला साजेसा खेळ करत एकेरी-दुहेरी धावा काढण्यावर भर दिला. जॉनी बेअरस्टो ३२ धावांवर माघारी परतला. तर मॉर्गनही अवघ्या चार धावा करू शकला. त्यानंतर मात्र रूट आणि बटलर यांनी पाचव्या गडय़ासाठी १३० धावांची भागीदारी रचली. बटलरने ७५ चेंडूंत कारकीर्दीतील नववे शतक झळकावले, तर रूटने १०७ धावांची खेळी करताना १० चौकार व एक षटकार लगावला. मात्र रूट व बटलर दोघेही माघारी परतल्यामुळे इंग्लंडचा संघ पिछाडीवर पडला. वहाबने ४८व्या षटकांत दोन बळी मिळवत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.