विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे विंडीजच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. निकोलस पूरनचे झुंजार अर्धशतक आणि ख्रिस गेल व शिमरॉन हेटमायर यांच्या छोटेखानी खेळीच्या बळावर विंडीजाला २०० चा आकडा गाठता आला, पण इतर फलंदाजांनी बेजबाबदार फटकेबाजी केल्याने त्यांचा डाव २१२ धावांवर आटोपला आणि विंडीजने इंग्लंडला २१३ धावांचे आव्हान दिले.
नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या कर्णधाराने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय इंग्लंडच्या वेगवान माऱ्याने सार्थ ठरवला. ख्रिस वोक्सने सुरुवातीलाच एव्हीन लुईसचा त्रिफळा उडवला आणि त्याला २ धावांवर माघारी धाडले. सलामीवीर ख्रिस गेल याने आश्वासक सुरुवात करत ५ चौकार आणि १ षटकार खेचला. पण ३६ धावांवर तो झेलबाद झाला. प्लंकेटने त्याचा अडसर दूर केला. शाय होपने ११ धावांवर तंबूचा रस्ता धरला. पण निकोलस पूरनने एक बाजू लावून धरली आणि शानदार अर्धशतक लगावले. त्याने ७८ चेंडूत ६३ धावांची खेळी साकारली. पण त्याला या खेळीचे शतकात रूपांतर करता आले नाही. आर्चरने त्याला माघारी पाठवले.
शिमरॉन हेटमायरने चांगली खेळी केली. पण ३९ धावांवर तो झेलबाद झाला. जो रूटने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केला. त्याच पद्धतीने त्याने जेसन होल्डरलाही ९ धावांवर बाद केले. आंद्रे रसलने २ षटकार आणि १ चौकार खेचत १६ चेंडूत २१ धावांची फटकेबाज खेळी केली. पण मोठी खेळी करण्यात त्यालाही अपयश आले. तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून इंग्लंडच्या वेगव अन गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली.
इंग्लंडकडून मार्क वुडने १८ धावांत ३ तर आर्चरने ३० धावांत ३ आहे. जो रुटने २ तर वोक्स आणि प्लंकेटने १-१ गडी टिपला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 14, 2019 7:07 pm