मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या चेंडूवर कर्णधार धोनीने मारलेला षटकार …. आणि भारताला मिळालं २०११ विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद! आजही प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात या आठवणी ताज्या आहेत. अनेकांना त्या क्षणी आपण नक्की काय करत होतो, हेदेखील आठवत असेलच. अशीच एक आठवण टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असलेला खेळाडू हार्दिक पांड्या याने सांगितली आहे.

IPL मध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित करणाऱ्या हार्दिक पांड्याने गेल्या काही वर्षात टीम इंडियामध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिकला संघात स्थान मिळाले आहे. मात्र २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी हार्दिक पांड्या कोण ? हेदेखील अनेकांना माहित नव्हते. तो त्यावेळी काय करत होता, याबाबत माहिती असणे तर खूपच लांब राहिले. पण या प्रश्नाचे उत्तर स्वतः हार्दिकने दिले आहे.

हार्दिक पांड्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये २ फोटो एकत्र करून पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोत हार्दिक पांड्याचा २०११ विश्वचषक स्पर्धेनंतर जल्लोष करतानाचा एक फोटो आहे.

हार्दिक त्याच्या मित्रांसोबत जल्लोष आणि सेलिब्रेशन करतानाचा तो फोटो आहे. तर दुसरीकडे हार्दिकने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियामध्ये असलेल्या आपल्या सहकाऱ्यांसोबतचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय, या ट्विटसोबत हार्दिकने ‘२०११ मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन ते २०१९ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी .. स्वप्नपूर्ती’ असे कॅप्शनदेखील लिहिले आहे.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव
युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा