भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा ज्वर संपूर्ण देशावर पसरलेला आहे. पुण्यातील क्रिकेट प्रेमी मिलिंद काची यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या जुन्या फियाट गाडीला दिमाखदार पद्धतीने सजवले.

पुण्यातील मिलिंद काची यांच्या कडे १९६१ सालची फियाट कार आहे. १६ जून म्हणजेच आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यासाठी प्रत्येक चाहता आपल्या पद्धतीने तयारी करताना दिसून आला. या सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमी मिलिंद काची यांनी फियाट कारच्या पुढील बाजूस तिरंगा लावून  शहरातील अनेक भागात फेरफटका मारला. १९८३ च्या वर्ल्ड कप दरम्यान मिलिंद काची यांच्या वडिलांनी हीच कार शहरात अशाप्रकारे तिरंगा लावून फिरवली होती.

या बाबत मिलिंद काची यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की मी भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना पाहिला आहे. यंदा मी कुटुंबासमवेत पाहणार आहे. माझ्या वडिलांनी १९६१ साली फियाट ही कार घेतली होती. वडिलांनी १९८३ साली वर्ल्ड कप दरम्यान मस्तपैकी गाडी सजवली. कारच्या पुढील बाजूस तिरंगा लावून त्यांनी शहरात फेरफटका मारला होता. तशाप्रकारे मी देखील आज गाडी सजवली आणि ‘फादर्स डे’च्या निमित्ताने वडिलांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले. तसेच आजच्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.

विश्वचषक स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. पण तिसरा सामना मात्र पावसामुळे वाया गेला. त्या सामन्यात शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात या प्रश्नावर उत्तर मिळाले आणि विजय शंकरला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली.

या निर्णयाबाबत बोलताना विराट म्हणाला की विजय शंकर हा प्रतिभावान खेळाडू आहे. विजय शंबकर संघात असल्यावर फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याची मदत होऊ शकते. त्याने आधी देखील चांगल्या खेळी केल्या आहेत. म्हणून त्याला संघात स्थान मिळाले आहे, असे तो म्हणाला.