भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच ‘हाय-व्होल्टेज’ असतो. त्यात जर तो विश्वचषक स्पर्धेतील सामना असेल, तर त्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहतात. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या आधी भारताचा न्यूझीलंडविरुद्ध १३ जूनला सामना होणार आहे, तर पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तानच्या वाहिन्यांवर आतापासूनच या सामन्याच्या जाहिराती दिसू लागल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याच्या दिवशी भारत – पाक सामन्याची जाहिरात दाखवण्यात आली. ‘फादर्स डे’ ही थीम घेऊन हि जाहिरात तयार करण्यात आली आहे. अनेक चाहत्यांकडून ती जाहीरात ट्विट करण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ –

या जाहिरातीनंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी यावर प्रचंड टीका केली. पण याच दरम्यान भारताकडून करण्यात आलेल्या जाहिरातीला पाकिस्ताननेही उत्तर दिले आहे.

भारतात पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. त्याला उत्तर म्हणून भारताने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. त्याच्या पुढच्या दिवशी पाकिस्तानची विमाने पुन्हा भारताच्या हद्दीत घुसली होती. ती विमाने परतवून लावताना वैमानिक अभिनंदन यांचं विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं आणि अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली, त्यावेळी त्यांनी भारतीय योजनांबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर त्यांना भारतात परत पाठवण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या हद्दीत विमान कोसळल्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेलया भारतीय हवाई दलातील वैमानिक अभिनंदन यांचा आधार घेऊन ही जाहिरात तयार करण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, भारताचे आतापर्यंत या विश्वचषक स्पर्धेत २ सामने झाले आहेत. या दोनही सामन्यात भारताला विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानचे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने झाले असून त्यांनी १ सामना गमावला, १ सामना जिंकला आणि १ सामना पावसामुळे रद्द झाला.