भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने प्रथम ‘टीम इंडिया’ला फलंदाजासाठी आमंत्रित केले. पावसाच्या अंदाजामुळे भारतीय कर्णधार कोहली त्यालादेखील प्रथम गोलंदाजीचा निर्णय घ्यायचा होता. पण नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यात शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी अखेर अष्टपैलू विजय शंकर याला संघात स्थान देण्यात आले आहे.

विश्वचषक स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. पण तिसरा सामना मात्र पावसामुळे वाया गेला. त्या सामन्यात शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात या प्रश्नावर उत्तर मिळाले आणि विजय शंकरला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली.

या निर्णयाबाबत बोलताना विराट म्हणाला की विजय शंकर हा प्रतिभावान खेळाडू आहे. विजय शंकर संघात असल्यावर फलंदाजीसह गोलंदाजीतही त्याची मदत होऊ शकते. त्याने आधी देखील चांगल्या खेळी केल्या आहेत. म्हणून त्याला संघात स्थान मिळाले आहे, असे तो म्हणाला.

अशी झाली शिखर धवनला दुखापत –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या हातावर चेंडू आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.