World Cup 2019 IND vs NZ : २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला. पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना ठरला. हा सामना नॉटिंगहॅमच्या मैदानावर होणार होता. पण नाणेफेकीच्या नियोजित वेळेच्या आधीपासूनच पावसाने जोर धरला. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणी आणि पावसाचा अंदाज घेण्यात आला. पण अखेर पावसाचाच जय झाला. पावसामुळे सामने रद्द होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पण या दरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने एक सल्ला ICC आणि सामना व्यवस्थापकांना दिला आहे.
“भारतात आणि विशेषतः पश्चिम बंगालमध्ये खूप पाऊस पडतो. पण आम्ही भारतात पावसापासून क्रिकेटच्या मैदानाचे रक्षण करण्यासाठी जे कव्हर वापरतो, ते कव्हर्स इंग्लंडमधूनच आणलेली आहेत. त्याच पद्धतीची कव्हर्स इंग्लंडनेही तिथे वापरायला हवीत. त्यांच्याच देशात तयार करण्यात आलेली कव्हर्स वापरण्याचा एक फायदा म्हणजे त्यांना ती कव्हर्स अर्ध्या किमतीत उपलब्ध होतील. तसेच त्यांना आयात करदेखील भरावा लागणार नाही. आम्ही तीच कव्हर्स सर्व सामन्यांमध्ये वापरतो. त्या कव्हर्समुळे पाऊस थांबला की १० मिनिटात सामना सुरु करता येतो. त्यांचे वजनही जास्त नाही. ती कव्हर्स अत्यंत हलकी आहेत. त्यामुळे कव्हर्स हटवायलाही फार वेळ लागत नाही. तशी कव्हर्स वापरण्याचा सल्ला गांगुलीने दिला आहे.
दरम्यान, पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. पण सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीचा भारतीय संघाला या सामन्यात फटका बसण्याची शक्यता होती. शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. भारताचा पुढील सामना १६ जूनला पाकिस्तानशी होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 14, 2019 5:23 pm