यंदाच्या विश्वचषकातील सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. १६ जून रोजी मॅन्चेस्टरमध्ये हे पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्यासाठी अनेक चाहते इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. तिकिटाचे पैसे नसल्यामुळे अनेक चाहत्याचे हे स्वप्न अधुरेच राहणार आहे. मात्र, पाकिस्तानमधील धोनीचा एक चाहता सामन्याचे तिकीट नसतानाही सहा हजार किलोमिटरचा प्रवास करत इंग्लंडमध्ये पोहचला आहे. त्या चाहत्याचे नाव मोहम्मद बशीर असे आहे. त्यांनी हा प्रवास केवळ भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भरोशावर केला आहे.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांदरम्यान कायम उपस्थित असणारे मोहम्मद बशीर चाचा शिकागो नावानेही ओळखले जातात. २०११ च्या विश्वचषकापासून धोनी बशीर चाचाला भारत-पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्याचे तिकीट देतो. तेव्हापासून आजपर्यंत भारत-पाक सामन्याचे तिकीट धोनीनेच दिलं आहे. बशीर चाचा पाकिस्तानच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येत असले तरी धोनीलासुद्धा ते तितक्याच उत्साहाने पाठिंबा देतात.

मॅन्चेस्टरला पोहोचल्यानंतर पाहिलं की तिकाटाच्या किंमती ७० हजारांच्या पुढे गेल्या आहेत. ऐवढ्या पैशांमध्ये मी अमेरिका फिरून येईल. मला तिकीट दिल्याबद्दल मी धोनीचा आभारी आहे. धोनीनं तिकीटासाठी मला संघर्ष करायला लावला नाही, असे बशीर चाचा म्हणाले.

दरम्यान, विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये १६ तारखेला ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे चाहतेही या सामन्याची तेवढ्याच अतुरतेने वाट पाहत आहेत.रविवारी मँचेस्टरमध्ये सामना अपेक्षित असला तरी पावसामध्ये सामना वाहून जाण्याची शक्यता आहे. जर हा सामना झाला नाही तर क्रीडारसिकांची निराशा होईल. भारत पाकिस्तान संघांमधला सामना हा नेहमीच पॉइंट टेबलचा विचार न करणारा नी ते युद्ध अनुभवायला मिळावं असाच असतो, त्यामुळे हा सामना व्हायलाच हवा असंच सगळ्यांना वाटत असेल यात काही शंका नाही