आज श्रीलंकेशी सलामीची लढत

लंडन : तब्बल सहा वेळा उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या न्यूझीलंडने चार वर्षांपूर्वी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. पण त्यांच्या पदरी अपयशच आले. विश्वविजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या न्यूझीलंडची यंदाच्या विश्वचषकात तरी स्वप्नपूर्ती होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. याच स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या न्यूझीलंडचा सलामीचा सामना कार्डिफ येथे श्रीलंकेशी होणार आहे.

ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने मायदेशात झालेल्या विश्वचषकात अंतिम फेरीत मजल मारली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे त्यांचे विश्वचषकाचे स्वप्न अधुरे राहिले होते. आता गेल्या वेळचाच संघ कायम असला तरी संघनायकाची जबाबदारी केन विल्यम्सनवर आली आहे.

गेल्या विश्वचषकानंतर न्यूझीलंडने उत्तुंग भरारी घेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांनी मायदेशातील मालिकेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारतावर विजय मिळवला होता. सराव सामन्यातही त्यांनी भारतावर मात करत आत्मविश्वास संपादन केला होता. मात्र वेस्ट इंडिजकडून दारुण पराभव पत्करल्यामुळे न्यूझीलंडचे विमान जमिनीवर आले आहे. आता कार्डिफ येथील सोफिया गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात विजयी प्रारंभ करण्याचे न्यूझीलंडचे मनसुबे आहेत.

न्यूझीलंडचे पारडे जड

१९९६च्या विजेत्या श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडचेच पारडे जड मानले जात आहे. चार वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या दिमुथ करुणारत्नेकडे श्रीलंकेचे नेतृत्व सोपवले असून जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या श्रीलंकेला बाद फेरीत पोहोचवण्याचे उद्दिष्ट त्याच्यासमोर आहे. मात्र न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रॉस टेलर, विल्यम्सन आणि मार्टिन गप्तील हे सध्या चांगल्या लयीत आहेत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रँडहोम आणि टिम साऊदी तसेच फिरकीपटू ईश सोधी आणि मिचेल सान्तनेर अशी जबरदस्त गोलंदाजी न्यूझीलंडकडे आहे.

मलिंगा, मॅथ्यूजवर भिस्त

श्रीलंकेला अनेक वादग्रस्त गोष्टींना सामोरे जावे लागत असून मध्यंतरीच्या काळात त्यांनी क्रिकेटच्या विविध प्रकारांमध्ये १० कर्णधार बदलून पाहिले. आता करुणारत्नेवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी युवा आणि अननुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या श्रीलंकेची भिस्त ही अँजेलो मॅथ्यूज आणि वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा यांच्यावरच आहे. २००७च्या विश्वचषक स्पर्धेत चार चेंडूंवर चार बळी मिळवणारा मलिंगा पुन्हा तशीच जादुई कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

सामना क्र. 3

न्यूझीलंड वि. श्रीलंका

’स्थळ : सोफिया गार्डन्स, कार्डिफ   ’सामन्याची वेळ : सायं. ६ वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १, स्टार प्रवाह मराठी.

संघ

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.

श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : ९८, न्यूझीलंड : ४८, श्रीलंका : ४१, टाय / रद्द : ९

विश्वचषकात   

सामने : १0,  न्यूझीलंड : ४, श्रीलंका : ६, टाय / रद्द : ०