२०१९ विश्वचषक स्पर्धेत केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. लंडनमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर २ गडी राखून मात केली. २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रॉस टेलरने ८२ धावांची खेळी केली, त्याला कर्णधार केन विल्यमसननेही चांगली साथ दिली.

चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो हे सलामीचे फलंदाज माघारी परतले. यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी झाली. ही जोडी न्यूझीलंडला विजयपथावर नेईल असं वाटत असतानाच केन विल्यमसन माघारी परतला. यानंतर टेलरही मोसादक हुसनेच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी काही उपयुक्त खेळी केल्या. अखेर मिचेल सँटनरने विजयी फटका खेळत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बांगलादेशकडून मेहदी हसन, शाकीब अल हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादक हुसैन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

त्याआधी, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा डाव २४४ धावांवर आटोपला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे हात मोकळे करण्याची फारशी संधी मिळू शकली नाही. शाकिब अल हसनने (६४) एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. त्यामुळे बांगलादेशने २४४ धावा केल्या.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. चांगली सलामी दिल्यानंतर ४५ धावांवर बांगलादेशला पहिला धक्का बसला. सौम्य सरकार २५ धावांवर माघारी परतला. त्याने ३ चौकार लगावले. पाठोपाठ तमिम इक्बालही माघारी परतला. त्याने ३ चौकरांसह २४ धावा केल्या. मुशफिकूर रहिमला चांगली सुरुवात मिळाली, पण तो १९ धावांवर बाद झाला. मोहम्मद मिथुनने बांगलादेशच्या धावसंख्येत २६ धावांची भर घातली. पण तोदेखील फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने एक बाजू लावून धरली. त्याने ७ चौकार ठोकत ६४ धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची योग्य साथ मिळू शकली नाही. त्यामुळे बांगलादेशचा संघ ४९.२ षटकात २४४ धावाच करू शकला.

न्यूझीलंडकडून हेन्रीने ४ बळी टिपले. ट्रेंट बोल्टने २ , तर फर्ग्युसन, ग्रँडहोम आणि सॅन्टनर यांनी १ बळी टिपत त्याला चांगली साथ दिली.