२०१९ विश्वचषक स्पर्धेत केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. लंडनमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशवर २ गडी राखून मात केली. २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून रॉस टेलरने ८२ धावांची खेळी केली, त्याला कर्णधार केन विल्यमसननेही चांगली साथ दिली. पहिल्यांदा गोलंदाजी करताना न्यूझीलंडने बांगलादेशला २४४ धावांवर रोखलं. ट्रेंट बोल्टने २ बळी घेत आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये १५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बोल्ट दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने ८१ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू साकलेन मुस्ताक या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने ७८ सामन्यांमध्ये १५० बळी घेतले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मोसादक हुसैन आणि मेहदी हसनला माघारी धाडलं. बोल्टव्यतिरीक्त न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीनेही सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्याने ४ बळी घेतले.