न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या बाबर आझमला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. बाबर आझमच्या १२७ चेंडूतील १०१ धावांच्या नाबाद शतकी खेळीमुळे पाकिस्तानने या महत्वपूर्ण सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

सामनावीराचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बाबर म्हणाला की, खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक नव्हती. फलंदाजी करणे कठीण होते. पण संपूर्ण ५० षटके खेळण्याचे माझे लक्ष्य होते. सामना संपेपर्यंत मी विकेटवर उभा राहिलो तर पाकिस्तान सामना जिंकणार हे मला माहित होतं.

वेगवान गोलंदाजांच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करायच्या हे आम्ही ठरवलं होतं. मिचेल सँटनेर गोलंदाजीला आल्यानंतर मोहम्मद हाफीझने मला खेळपट्टीवर टिकून राहण्याचा सल्ला दिला व प्रत्येक षटकांमध्ये तीन ते चार धावा काढण्याची आमची योजना होती असे बाबर आझमने सांगितले.

बाबर आझमची संयमी शतकी खेळी आणि त्याला हारिस सोहेल-मोहम्मद हाफीजने दिलेल्या साथीच्या जोरावर, पाकिस्तानने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली आहे. या विजयासह पाकिस्तानचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अद्याप कायम आहे. २३८ धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. मात्र बाबर आझमने सर्वात प्रथम मोहम्मद हाफिज आणि त्यानंतर हारिस सोहेलच्या साथीने भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बाबर आझमने नाबाद १०१ तर हारिस सोहेलने ६८ धावांची खेळी केली.