सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेली विश्वचषक स्पर्धा पावसाच्या मुद्द्यावर गाजते आहे. गुरुवारी होणार असलेला भारत आणि न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला. पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना ठरला. पण या आधी भारताच्या सामन्यात चर्चेचा मुद्दा ठरला तो माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने वापरलेले बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज. या मुद्द्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी वक्तव्य केले आहे.

एक कार्यक्रमात एहसान मणी यांना धोनीच्या ग्लोव्ह्जबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मणी म्हणाले की अशा प्रकारच्या गोष्टींवर पाकिस्तान किर्केट संघाकडून कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ क्रिकेट खेळायला गेला आहे, ते करणं एवढाच आमचा हेतू आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या चिन्हांचा किंवा इतर गोष्टींचा वापर करण्याची गरज नाही. क्रिकेटकडे मी नेहमी सज्जनांचा खेळ म्हणूनच पाहिले आहे. क्रिकेटमुळे दोन देशांतील गैरसमज दूर होतात आणि चांगले संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे क्रिकेट हे खेळापुरतेच मर्यादित ठेवले जायला हवे”, असे मणी यांनी स्पष्ट केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांसाठी दाखवण्यात येणाऱ्या जाहीरातीवरही मणी यांनी नाराजी व्यक्त केली. “ICC ने या प्रकारच्या जाहिरातींवर नोंद घ्यायला हवी. स्टार हा विश्वचषक स्पर्धेचा ब्रॉडकास्टर आहे, तो भारताचा ब्रॉडकास्टर नाही. ICC ने त्यांना सामना आणि इतर बाबी प्रसारणाचे हक्क दिले आहेत. ते केवळ भारतापुरते मर्यादित नाही. त्यामुळे ‘स्टार’ने सर्व संघांबाबत समान धोरण ठेवायला हवे. ती जाहिरात हा क्रिकेटचा भाग नक्कीच नाही”, असेही सांगत त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली.