पाकिस्‍तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं आपला ऑल टाइम वर्ल्‍डकपचा संघ निवडला आहे. आफ्रिदीने निवडलेला संघ क्रीडा रसिंकाना रूचल्याचे दिसत नाही. कारण,संघात अनेक दिग्गज खेळाडूंना स्थान दिले नाही. आफ्रिदीच्या संघात महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि एम.एस धोनीलाही स्थान दिले नसल्यामुळे भारतीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आफ्रिदीने आपल्या संघात एकमेव भारतीय खेळाडू विराट कोहलीची निवड केली आहे. या संघात सर्वाधिक खेळाडू पाकिस्तानचे आहेत. या संघात तब्बल पाच खेळाडू पाकिस्तानचे आहेत तर चार खेळाडू ऑस्ट्रेलिया संघातील आहेत. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे श्रीलंका आणि इंग्लंड संघातील एकाही खेळाडूला ऑफ्रिदीने आपल्या संघात स्थान दिले नाही.

सहा वर्ल्डकप खेळणाऱ्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही आफ्रिदीने संघात स्थान दिले नाही. सहा वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडूलकरने ४४ डावांत ५६.९५ च्या सरासरीने २२७८ धावा केल्या आहेत. यामध्ये सहा शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय संघाला २०११ चा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कॅप्टन कूल धोनीलाही आफ्रिदीने संघात स्थान दिले नाही. आफ्रिदीच्या संघावर क्रीडा रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आफ्रिदीचा ऑल टाइम वर्ल्‍डकप संघ –
सईद अन्वर, अॅडम गिलख्रिस्‍ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, इंजमाम उल हक, जॅक कॅलीस, वसीम अक्रम, ग्लेन मॅक्ग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्‍तर आणि साकलेन मुश्‍ताक.