भारताचा सलामीवीर डावखुरा फलंदाज शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनने दमदार शतक ठोकले होते, पण दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यानंतर आज त्याच्या दुखापतीमुळे त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून त्याची ही दुखापत डावखुऱ्या ऋषभ पंतसाठी विश्वचषक प्रवेशाची संधी ठरणार का? असा एक सवाल सर्वत्र विचारला जातो आहे.

शिखर धवन हा डावखुरा फलंदाज आहे. भारताच्या विश्वचषक स्पर्धेच्या १५ खेळाडूंच्या संघात एकूण ३ डावखुरे फलंदाज आहेत. त्यापैकी सध्याच्या अंतिम ११ च्या संघात २ फलंदाज खेळत असून त्यातही एक फलंदाज हा कुलदीप यादव आहे. त्याला फलंदाजीचा फारसा अनुभव नाही. याशिवाय राखीव ४ खेळाडूंमध्ये रवींद्र जाडेजा हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. पण जाडेजा हा सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणारा खेळाडू आहे. अशा परिस्थितीत पहिल्या ६ फलंदाजांमध्ये असलेला समतोल कायम ठेवण्यासाठी डावखुऱ्या फलंदाजाच्या जागी डावखुरा फलंदाज म्हणून सध्या ऋषभ पंत हा चांगला पर्याय भारताकडे उपलब्ध आहे.

शिखर धवन हा सलामीवीर आहे. त्याच्या जागी लोकेश राहुल हा सलामीला उतरू शकतो. त्यामुळे मधल्या फळीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी दिनेश कार्तिक किंवा विजय शंकर यांना संघात स्थान मिळू शकते, अशीदेखील चर्चा आहे. परंतु तसे झाल्यास भारताकडे पहिलया ६ फलंदाजांमध्ये एकही डावखुरा फलंदाज नसेल. अशा परिस्थितीमध्ये ऋषभ पंतला संधी देऊन एका डावखुऱ्या फलंदाजाला संघात घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देता येऊ शकेल. तसेच विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर ऋषभ पंतला वगळणे हा त्याच्यावर अन्याय आहे असे मत अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले होते.

या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिखरच्या हाताच्या अंगठ्याला झालेली दुखापत ऋषभ पंतच्या वर्ल्डकप प्रवेशाचे तिकीट ठरणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

काय आहे शिखर धवन दुखापत प्रकरण –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या हातावर चेंडू आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे शिखर धवनला वर्ल्डकपला मुकावे लागण्याचीही शक्यता आहे.