इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेशी उद्या होणार आहे. या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेचा आघाडीचा गोलंदाज डेल स्टेन हा खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्युरोन हॅन्ड्रिक्स याला संघात स्थान देण्यात आले आहे. आफ्रिकेच्या पहिल्या २ सामन्यातही स्टेन दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे आफ्रिकेची ‘स्टेन’गन धडाडण्याआधीच थंडावली आहे.

डेल स्टेनचा हा शेवटचा विश्वचषक होता. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे शेवटचा विश्वचषकदेखील त्याला खेळता आला नाही. आफ्रिकेचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध झाला, तर दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध झाला. या दोनही सामन्यात डेल स्टेन खेळू शकला नाही. खांद्याच्या दुखापतीने त्याला जायबंदी केले होते. त्यानंतर उद्या भारताविरुद्धच्या सामन्याआधी स्टेनच्या दुखापतीची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. परिणामी त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज याला संघात स्थान देण्यात आले.

“क्रिकेटपमधून निवृत्त होण्याआधी मला माझ्या संघाला विश्वचषकाची ट्रॉफी मिळवून द्यायची आहे. या विश्वचषक स्पर्धेत खेळताना मी माझे सर्वस्व पणाला लावून खेळेन. माझ्या घरात अनेक महत्वाच्या ट्रॉफी आहेत, पण विश्वचषक विजेतेपदाची ट्रॉफी नाही. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय किर्केटमधून निवृत्त होण्याआधी मला माझ्यात संघाला विश्वविजेता करायचे आहे. आमच्या संघात चांगले फलंदाज आहेत. ३ ते ४ अष्टपैलू खेळाडू आहेत. तुम्ही संघ पाहिलात तर तुम्हाला एक बाब नक्कीच लक्षात येईल की हे खेळाडू सर्वोत्तम नसले तरी प्रतिभावान आहेत. विश्वचषक स्पर्धेचे वातावरणच खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे विश्वचषकातील आफ्रिकेचा भूतकाळ विसरुन खेळाडू खेळले तर त्याचा नक्कीच स्पर्धेत फायदा होईल”, असे स्टेनने स्पर्धेआधी म्हटले होते. पण त्याला या स्पर्धेत खेळता आले नाही.

डेल स्टेन IPL 2019 मध्ये बंगळुरू संघाचा भाग होता. पण त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला फार सामने खेळणे शक्य झाले नाही. त्याने बंगळुरूकडून २ सामने खेळले. त्यात त्याची कामगिरी चांगली झाली. पण २ सामन्यानंतर तो दुखापतीमुळे आफ्रिकेला परतला होता.