भारतीय संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. भारताने मंगळवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर भारताने उपांत्य फेरीतील तिकीट पक्के केले. बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला धूळ चारली. त्यामुळे इंग्लंडचा संघही उपांत्य फेरीत दाखल झाला असून चौथा संघ न्यूझीलंड असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आता उपांत्य फेरीत भारतीय संघ पुन्हा भगव्या रंगांच्या कपड्यांमध्ये मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

बुधवारी झालेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या, भारत दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या तर न्यूझीलंड चौथ्या स्थानी आहे. शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील साखळी सामन्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील सामना कोणाशी होणार हे ठरेल. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी पाहता दक्षिण आफ्रिकेकडून त्यांचा पराभव होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. तर दुसरीकडे शनिवारी भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेची कामगिरी पाहता हा सामना भारत हा सामना आरामात जिंकू शकेल असं बोललं जातं आहे. त्यामुळे हे दोन्ही निकाल लागले तर सध्याच्या गुणतालिकेप्रमाणेच संघांचे क्रमांक कायम राहतील.

उपांत्य फेरीमध्ये गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी दोन हात करेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतीम सामन्यातील प्रवेशासाठी लढतील. उपांत्य फेरीतील पहिला सामना ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्या दरम्याने होईल. ११ तारखेला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय संघ यजमान इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी सज्ज असेल. त्यामुळेच इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना असेल तर विश्वचषकाच्या नियमाप्रमाणे भारताला त्यांच्या ‘अवे’ जर्सीमध्ये म्हणजेच भगव्या जर्सीमध्येच हा सामना खेळावा लागेल. मात्र अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि भारताने श्रीलंकेला धूळ चारली. तर उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना झाला तर त्यावेळी भारतीय संघ निळ्या रंगाच्या जर्सीमध्येच मैदानावर उतरले. भारत अंतिम सामन्यात पोहचला तरी निळ्या रंगाच्या जर्सीमध्येच भारतीय खेळाडू विश्वचषक जिंकण्यासाठी खेळताना दिसतील.

भगवी जर्सी का?

२०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने ‘होम’ आणि ‘अवे’ ही संकल्पना राबवली होती. त्यानुसार एकाच रंगाची जर्सी घालून खेळणाऱ्या संघाना ‘होम’ आणि ‘अवे’ सामन्यांकरता वेगवेगळ्या जर्सी घालणं बंधनकारक होतं. त्यामुळेच ३० जून रोजी इंग्लंडविरोधात झालेल्या सामन्यामध्ये नवीन भगव्या रंगाची जर्सी घालून टीम इंडिया मैदानात उतरली होती. या सामन्यामध्ये भारताचा ३१ धावांनी पराभव झाला होता. उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडदरम्यान सामना झालाच कोहली अॅण्ड कंपनी या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानेच भगव्या जर्सीमध्ये मैदानात उतरेल यात शंका नाही.