16 October 2019

News Flash

World Cup 2019 : ‘…म्हणून पंतला वगळलं’; निवड समितीचं स्पष्टीकरण

ऋषभ पंत की दिनेश कार्तिक यावरून दीर्घ काळ चर्चा झाली, असेही प्रसाद यांनी सांगितले

ICC World Cup 2019 या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. या बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याची चर्चा होती, पण त्याच्या जागी दिनेश कार्तिक यालाच निवड समितीची पसंती मिळाली आहे. पंतला संघातून का वगळण्यात आले? याबाबत पत्रकार परिषदेत निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले. ‘संघात ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी कोणता खेळाडू समाविष्ट करावा यावरून आमची दीर्घ काळ चर्चा झाली. प्रामुख्याने एखाद्या सामन्यात धोनी दुखापतग्रस्त झाला, तर त्या जागी पंत किंवा कार्तिक यांच्यातील एकाला मैदानावर उतरण्याची संधी मिळेल ही गोष्ट ध्यानात आम्ही ठेवली होती. अशा वेळी कार्तिक हा यष्टिरक्षणाच्या दृष्टीने पंतपेक्षा सरस आहे’, असे प्रसाद म्हणाले.

तसेच हार्दिक पांड्या याच्या समवेत आणखी एक वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला रायडूपेक्षा प्राधान्य देण्यात आले. याशिवाय, लोकेश राहुल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभावी दिसला नाही. मात्र गेल्या काही काळात देशांतर्गत स्पर्धामध्ये आणि IPL मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव
युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा

First Published on April 15, 2019 10:13 pm

Web Title: icc world cup 2019 this is the reason why dinesh karthik chosen over rishabh pant clarifies selector msk prasad