विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात विंडीजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांची भंबेरी उडाली, पण ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार तडाखा देत विंडीजला २८९ धावांचे आव्हान दिले. ५ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना नॅथन कुल्टर-नाईल (९२), स्टीव्ह स्मिथ (७३) आणि ऍलेक्स कॅरी (४५) या तिघांनी धमाकेदार खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला २८८ धावांपर्यंत मजल मारून दिली. या सामन्यात पुन्हा एकदा चर्चा रंगली ती शेल्डन कॉट्रेल याच्या अनोख्या ‘सॅल्यूट’ सेलिब्रेशन…

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. १५ या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला पहिला गडी गमवावा लागला. थॉमसने फिंचला ६ धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरला कॉट्रेलने तंबूचा रस्ता दाखवला. वॉर्नरला केवळ ३ धावा करता आल्या. त्याचा काटा काढल्यानंतर कॉट्रेलने झकासपैकी त्याला लष्करी परेड करून आणि सॅल्यूट करून अलविदा म्हटले.

त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न आंद्रे रसलने हाणून पाडला. बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळण्याचा मोह ख्वाजाला आवरला नाही. त्याने फटका खेळला. पण त्याच्या बॅटची कड लागून चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला. यष्टीरक्षक शाय होप याने अप्रतिम उडी मारून त्याचा झेल टिपला. ख्वाजा १९ चेंडूत २ चौकरांसह १३ धावा केल्या. त्यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलही २ चेंडू खेळून बाद झाला. त्यानंतरही त्याने झकासपैकी सॅल्यूट मारून सेलिब्रेशन केले आणि त्याला ‘बाय-बाय’ केले.

त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनची चर्चा सर्वत्र रंगली. विश्वचषक सामन्यात दोन डावांच्या मध्यंतरामध्ये मैदानावर चर्चेसाठी आलेल्या समालोचकांनाही त्याच्या या ‘सॅल्यूट’ सेलिब्रेशनची भुरळ पडलेली दिसून आली. त्यांनीही सॅल्यूट करत त्याच्या कामगिरीला आणि निष्ठेला सलाम केला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाची अवस्था डावाच्या सुरूवातीला ४ बाद ३८ अशी झाली होती. स्टॉयनीसदेखील १९ धावांवर माघारी परतला. पण त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईल या दोघांनी मात्र दमदार फलंदाजी केली. या दोघांनी १०२ धावांची भागीदारी केली. स्मिथ बाद झाला, तरीही कुल्टर-नाईलने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ६० चेंडूत ९२ धावा केल्या. त्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. स्टीव्हन स्मिथने ७३ धावा केल्या. तर कॅरीने ४५ धावा केल्या.