“कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच विश्वचषक आहे, त्यामुळे मला भारतीय संघाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे. मी या आव्हानाकडे एका वेगळ्या नजरेने पाहत आहे. हे आव्हान माझ्यासाठी खूपच रंजक आणि रोमांचक असेल. या आधी भारतीय संघाचे नेतृत्व अनेक महान खेळाडूंनी केले आहे. त्या महान खेळाडूंनी भारताला क्रिकेटमध्ये एक वेगळी उंची गाठून दिली आहे. या स्पर्धेत मी देखील संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्सहन देईन आणि स्वतः उत्तम कामगिरी करण्यावर भर देईन”, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारी भारताचा पहिला सामना होणार आहे. त्याआधी विराटने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी तो बोलत होता.

“कर्णधार म्हणून हा विश्वचषक नक्कीच महत्वाचा आहे. ही स्पर्धा खूप लांबलचक आहे. एकाही संघाशी तुम्हाला पहिल्या फेरीत पुन्हा खेळायला मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक संघाविरुद्ध ज्या योजना केल्या जातील, त्या अंमलात आणून सामना चांगला खेळणे हेच उद्दिष्ट असेल. त्याचबरोबर एकदा तो सामना झाला की ते विसरून जायचे आणि पुढच्या सामन्याच्या तयारीला लागायचे, हेच करावे लागेल. तसेच, डावात ३० वे षटक ते ४० वे षटक या कालावधीत भागीदारी करणे महत्वाचे आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

इंग्लंडमध्ये चॅपियन्स ट्रॉफीमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्वीकरावा लागला होता. त्याबाबत बोलताना विराट म्हणाला की आम्ही फार काही चुकीचे खेळलेलो नव्हते. पण त्या विशिष्ट दिवशी जो संघ चांगला खेळतो, तो जिंकतो हेच खरे. विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने पाहायचे झाले, तर दडपणाच्या क्षणी अनुभव उपयोगी येतो. आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेत आमच्या संघ चांगली कामगिरी करेल”, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

विश्वचषक स्पर्धेत जो खेळाडू पहिल्या सामन्यात शतक करतो, तो संघ विश्वविजेता ठरतो, असा योगायोग आहे. यंदाही से होईल का? असे विराटला विचारण्यात आले. त्याबाबत बोलताना विराट म्हणाला की लोकांच्या आणि चाहत्यांच्या कायमच अशा अपेक्षा असतात. पण काय करावे हे चाहत्यांकडून सांगण्यात येणे याला अर्थ नाही. कारण प्रत्येक खेळाडू हा जास्तीत जास्त धाव करण्यासाठीच खेळत असतो. त्यामुळे मी देखील तोच प्रयत्न करणार आहे आणि भारतीय संघासाठी अधिकाधिक धावा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

“दुखापतीमुळे स्टेनला स्पर्धेबाहेर व्हावे लागणे दुर्दैवी”

स्टेनच्या दुःपतीचे समजल्यानंतर दुःख झाले. तो खूप चांगली कामगिरी करत होता. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. IPL मध्ये तो आणि मी RCB मधून खेळलो. तो खूपच प्रेरणादायी खेळ करू शकतो, त्यामुळे त्याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले या गोष्टीचे मला फारच वाईट वाटले. त्याने लवकर तंदुरुस्त व्हावे हीच प्रार्थना, असे विराट म्हणाला.

कागिसो रबाडाच्या टीकेला प्रत्यक्ष भेटून उत्तर देईन!

रबाडा कायमच चांगला गोलंदाज आहे. तो फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून कायमच मैदानावर उतरेल. पण त्याने जे काही माझ्याबाबत विधान केले आहे. त्याबाबत मला पत्रकार परिषदेत काहीही बोलायचे नाही. ते मी त्याच्याशी भेटूनच बोलेन, अशा शब्दात त्याने वादावर उत्तर देणे टाळले.